मुंबई : मुंबई विमानतळाची विद्यमान क्षमता वाढवण्यासाठी, गर्दीच्या वेळी (पीक-अवर) ताशी ५५ विमानांची (एटीएम) वाहतूक करण्यासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) विविध एअरसाइड प्रकल्प हाती घेणार आहे. यासाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान तैनात करण्याचे, तसेच क्रू टर्मिनल उभारण्याचे कंपनी नियोजन करीत आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण १,९०० एकरांवर पसरले आहे. विमानतळावर सध्या एकमेकांना छेदणाऱ्या (क्रॉस) ०९/२७ आणि १४/३२ अशा दोन धावपट्ट्या आहेत. या धावपट्ट्या एकमेकांना छेदत असल्यामुळे, एकाच वेळी टेकऑफ व लँडिंग शक्य होत नाही. मुंबई विमानतळावर दोन विमान हालचालींमधील कालावधी केवळ ६५ सेकंद आहे.
सुधारणांच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजातील माध्यमातून, व्यग्र क्षमता सध्याच्या ४६ एटीएमवरून सुमारे ५२-५५ एटीएमपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. एअरसाइड कामकाज सुधारण्यासाठी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचा (एएएचएल) भाग असलेली मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) धावपट्टी १४/३२ च्या बाजूने ई ५ व ई ७ दरम्यान पूर्व समांतर टॅक्सी वे बांधणार आहे.
विमानांचा क्रम सुधारण्यासाठी व उड्डाणास होणारा विलंब कमी करण्यासाठी, मिठी नदीवरील पुलासह टॅक्सी वे एमचा विस्तारदेखील करण्यात येईल. धावपट्टीवरील विमानांचा व्याप कमी करण्यासाठी व विमानांचे मागे फिरण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, धावपट्टी १४/३२ च्या बाजूने असलेल्या पश्चिम समांतर टॅक्सीवे, डब्ल्यू/डब्ल्यू १ चे काही भाग विकसित केले जाणार आहेत. मुंबई विमानतळाने २०२५-२६ मध्ये ५५.३ दशलक्ष प्रवाशांची हाताळणी केली, त्यात ३८.९ दशलक्ष देशांतर्गत व १६.४ दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता.
फायदा काय?
तासाभरात विमान फेऱ्या ४६ वरून ५२-५५ पर्यंत वाढवणे.
विमानांचे उड्डाण व लँडिंग सुलभ करणे.
प्रवासातील विलंब कमी करणे
सुधारणा काय?
नवीन समांतर टॅक्सीवे तयार करणे.
टॅक्सीवे ‘एम’ व ‘एन’ चा विस्तार करणे.
आधुनिक पृष्ठभाग व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरणे.
समर्पित क्रू टर्मिनल उभारणे.
