मुंबई : चॉकलेटच्या वेष्टनाचा वापर करून गांजाची आंतरराष्ट्रीय तस्करी करण्याचा प्रयत्न मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने उधळून लावला. बँकॉकहून मुंबईत आलेल्या भूतानमधील दोन नागरिकांकडून स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे तीन किलो गांजा जप्त करण्यात आला. या दोघांनाही अटक करण्यात आली असून, या तस्करीमागील परदेशी आणि स्थानिक सूत्रधारांचा शोध सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने प्रवाशांच्या तपासणीदरम्यान पहिली कारवाई केली. थायलंडमधील बँकॉकहून आलेल्या भूतानमधील या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी चॉकलेटच्या वेष्टनाता लपवलेली सात पाकिटे आढळली. या पाकिटांमध्ये एक किलो ४५२ ग्रॅम गांजा लपवण्यात आला होता. चौकशीदरम्यान सहज आणि कमी वेळेत पैसे मिळवण्याच्या आमिषाने या तस्करीत सहभागी झाल्याची कबुली त्याने दिल्याचे समजते. त्यानंतर त्याला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली.

पहिल्या कारवाईनंतर सीमाशुल्क विभागाने अशाच प्रकारे दुसऱ्या प्रवाशाची तपासणी केली. ताशी तेनझिन या भूतानमधील अन्य नागरिकाच्या सामानाची झडती घेतली असता त्यात चॉकलेटचे सात खोके आढळले. या खोक्यांमध्ये लपवलेला सुमारे एक किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ बाळगण्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

दोन्ही प्रवासी बँकॉकहून मुंबईत आले होते. शेजारील देशांतील नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरण्याची पद्धत आंतरराष्ट्रीय तस्करी करणाऱ्या टोळ्यांकडून अवलंबली जात असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींच्या जबाबांमधून परदेशी तसेच स्थानिक हस्तकांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे अमली पदार्थांचा पुरवठा कोठून करण्यात आला, मुंबईत ते कोणाला देण्यात येणार होते आणि या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.