मुंबई : वाढत्या विमान इंधन दरांमुळे इंडिगो,एअर इंडियासह एअर इंडिया एक्सप्रेसने देशांतर्गत विमान वाहतूकीत कपात केली आहे. १ जूनपासून दररोज देशांतर्गत २५० हून अधिक उड्डाणे रद्द होणार असल्याने याचा सर्वाधिक फटका मुंबई विमानतळाला बसला आहे. विमान कपातीचा परिणाम मुंबई ते जयपूर, गोवा, बंगळूरु व हैदराबाद या प्रमुख मार्गांवर होणार आहे.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे आणि प्रवासी मागणीतील घटीमुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. वाढता तोटा कमी करण्यासाठी देशातील तीन प्रमुख विमान कंपन्या इंडिगो,एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने देशांतर्गत विमान संख्येत कपात केली आहे, जून ते ऑगस्ट दरम्यान देशांतर्गत विमान संख्या कमी असणार आहे. या तीन महिन्यात इंडिगो ११०, एअर इंडिया ११० आणि एअर इंडिया एक्स्प्रेस ३०-३५ उड्डाणे कमी करणार आहे.

देशातील सर्वात व्यस्त विमान वाहतूक केंद्रांपैकी मुंबई विमानतळ एक आहे.मुंबई विमानतळावरुन दररोज १ हजार विमानांची ये-जा होते.त्यापैकी सुमारे ४५० ते ५०० विमाने देशांतर्गत वाहतूक करतात. विमान कपातीमुळे मुंबईतून जयपूर, गोवा, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर, पाटणा आणि भोपाळ यांसारख्या अनेक प्रमुख देशांतर्गत मार्गांवरील विमान फेऱ्या कमी होणार आहेत. या निर्णयामुळे विमानांमध्ये गर्दी, जागांची मर्यादित उपलब्धता आणि विमान तिकिट दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या दररोज सुमारे २,२०० उड्डाणे चालवणारी इंडिगो, आपली देशांतर्गत क्षमता जवळपास ५-७ टक्क्यांनी कमी करत आहे, ज्यामुळे दररोज अंदाजे ११० उड्डाणे कमी होतील. एअर इंडिया जून आणि जुलै महिन्यात आपल्या देशांतर्गत सेवांमध्ये जवळपास २२ टक्के कपात करणार आहे. ज्यामुळे दररोजच्या सुमारे ५०० उड्डाणांच्या वेळापत्रकातून अंदाजे ११० उड्डाणे कमी होतील. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या देशांतर्गत सेवांमध्ये जवळपास १० टक्के कपात करत आहे, ज्यामुळे दररोज सुमारे ३०-३५ उड्डाणे कमी होतील.

विमान इंधनात २५ टक्यांनी वाढ

एप्रिल महिन्यात देशांतर्गत विमानसेवांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने विमान कंपन्यांचा परिचालन खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे.विमान कंपन्यांनी उन्हाळ्याच्या ऐन गर्दीनंतर प्रवासाची मागणी कमी झाल्याचेही निदर्शनास आणले आहे.

विमान तिकिटात वाढ

अनेक मार्गांवरील विमान तिकिटात आधीच जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, विमान कंपन्यांनी प्रति प्रवासी ४०० ते ४५० रुपयांपर्यंत इंधन अधिभारही आकारला आहे.त्यातच आता विमानांची संख्या आणखी कमी झाल्याने तिकिट दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आसन क्षमता कमी झाल्याने आणि कॉर्पोरेट व पर्यटकांकडून असलेल्या सततच्या मागणीमुळे, मुंबई, दिल्ली आणि बंगळूरुला जोडणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात भाडेवाढ होईल.