मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाढती गर्दी, तांत्रिक बिघाड, खराब हवामान आणि मर्यादित धावपट्टी क्षमतेमुळे विमानांच्या वक्तशीरपणात मोठी घसरण झाली आहे. मार्च २०२६ मधील आकडेवारीनुसार, मुंबई विमानतळ वक्तशीरपणात देशातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या विमानतळांपैकी एक ठरले आहे.
नागरी विमानन महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीनुसार, भारतातील १० सर्वात व्यस्त विमानतळांच्या ‘वेळेवर कामगिरी’ क्रमवारीत मुंबई विमानतळ पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर आहे. जानेवारी महिन्यात मुंबईतून केवळ ४९ टक्के (म्हणजेच दर दोन विमानांपैकी एक) विमान वेळेवर रवाना झाल होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये वेळेचे पालन करण्याचे प्रमाण सुधारून ५५ टक्के आणि मार्चमध्ये ७२ टक्के झाले. विमान नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटांहून अधिक उशिराने रवाना झाल्यास, त्याला ‘विलंबित’ म्हणून वर्गीकृत केले जाते. परंतु, सर्वच विलंबांचे कारण मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीची कोंडी नसून अनेक विमाने एअरलाईन्सची अंतर्गत ऑपरेशनल कारणे, कर्मचाऱ्यांची कमतरता, खराब हवामान इत्यादी कारणांमुळे उशिराने रवाना होतात.
दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या इतर प्रमुख महानगरांच्या तुलनेत, मुंबई विमानतळावर समांतर धावपट्टी उपलब्ध नाही. मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी किंवा उतरणारी सर्व विमाने केवळ एकाच कार्यरत धावपट्टीचा वापर करतात. ज्यामुळे हवाई वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद पहिल्या तीनमध्ये
तीन महिन्यांच्या कालावधीत ‘वेळेवर कामगिरी’ क्रमवारीत सातत्याने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद पहिल्या तीन क्रमांकांवरील विमानतळे आहेत. मार्च महिन्यात, चेन्नई विमानतळावरून ९३, हैदराबादवरून ९० आणि बंगळुरूवरून ८८टक्के विमाने वेळेवर रवाना झाली.
विमान कंपन्यांचा मुंबईतील वक्तशीरपण कमीच
इंडिगो, एअर इंडिया, अकासा एअर आणि स्पाईस जेट यांसारख्या बहुतांश विमान कंपन्यांच्या प्रमुख केंद्रांच्या तुलनेत मुंबईमध्ये ‘वेळेवर कामगिरी’चे प्रमाण कमी आहे. उदाहरणार्थ, इंडिगोचा मुंबईतील वक्तशीरपणा सुमारे ७८ टक्के आहे. तर चेन्नई विमानतळावर (९७ टक्के) आणि कोलकातामध्ये (९३टक्के) आहे.
व्यावसायिक दृष्ट्या नवी मुंबई फायदेशीर नाही
मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करायची असेल, तर विमान कंपन्यांना मुंबईतील काही ‘स्लॉट्स’ (उड्डाण वेळा) नवी मुंबई विमानतळाकडे वळवणे आवश्यक आहे .मात्र सध्या व्यावसायिकदृष्ट्या हे करणे फायदेशीर नसल्याचे एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
कारणे काय
स्पाइसजेटचा बोजवारा : मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानांची वेळ अत्यंत खराब असून, त्यांची वक्तशीर कामगिरी फक्त २९ टक्क्यांवर आहे.
धावपट्टीची मर्यादित क्षमता : विमानतळावर दोन धावपट्ट्या एकमेकांना छेदत असल्याने एकाच वेळी दोन्ही धावपट्ट्या वापरता येत नसल्याने उड्डाणांना उशीर होतो.
तांत्रिक समस्या: वाढत्या विमान हालचालींमुळे एअर ट्रॅफिकमध्ये अडथळे आणि तांत्रिक बिघाड होतो.
