मुंबई : गेल्या दोन दिवसांत शहरात झालेल्या पावसामुळे मुंबई विमानतळावरील वाहतुक कोलमडली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानतळावरील धावपट्टी रविवारी एक तास बंद करण्यात आली होती. तर सोमवारी पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाल्याने हवाई वाहतुकीला फटका बसला. मुंबई विमानतळावर रविवार – सोमवारी येणाऱ्या-जाणाऱ्या सुमारे ८०० हून अधिक विमानांना विलंब झाला, तर ५० पेक्षा जास्त विमाने रद्द करण्यात आली. तसेच २० विमानांचे मार्ग बदलण्यात आले, तर अनेक विमाने पहिल्या प्रयत्नात धावपट्टीवर उतरवता आली नाहीत. त्यामुळे या विमानांना हवेत घिरट्या माराव्या लागल्या. एकूण परिस्थितीमुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती. मंगळवारी पावसाने उसंत घेतल्याने हवाई वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.
पावसाळ्यात हवेतील दृश्यमानता कमी असते. मुंबई विमानतळावर विमान उतरण्यासाठी धावपट्टीची किमान दृश्यमानता ५५० मीटर असणे आवश्यक असते. दृश्यमानता ५५० मीटरपेक्षा कमी झाल्यास वैमानिकांना विमान उतरवणे कठीण होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव विमाने इतरत विमानतळांवर वळवली जातात. मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. दिवसभरात सुमारे एक हजार विमानांची मुंबई विमानतळावरुन ये-जा होते. तासाला सुमारे ४८ विमानांची वाहतूक होते. यात २४ विमानांचे आगमन आणि २४ विमानांचे उड्डाण होते.
रविवारी सकाळी विमानतळावर दृश्यमानता खूपच कमी असल्याने धावपट्टी सकाळी साडेदहा ते साडेअकरा दरम्यान एक तास बंद करावी लागली होती. धावपट्टी बंद असल्याने रविवारी २२ विमाने रद्द करावी लागली होती. मुंबईत येणाऱ्या १११ आणि जाणाऱ्या २२३ अशा एकूण ३३४ विमानांना विलंब झाला होता. ४० ते ५५ मिनिटांपर्यंत विमानांना विलंब झाला. तसेच १३ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. यामुळे रविवारी मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
हवामान खात्याने मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. एअर इंडिया, इंडिगो, एअर एक्स्प्रेस आणि स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या विमानांची स्थिती पाहून प्रवास केला. सोमवारच्या पावसामुळे दिवसभरात ४०२ विमानांना विलंब झाला. १७ विमाने रद्द, तर ५ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. यात देशांतर्गत आणि लांबपल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश होता. या विमानांमध्ये इंडिगोच्या प्रयागराज आणि सिंगापूरहून येणाऱ्या विमानांचा समावेश होता, ही विमाने हैदराबादला वळवण्यात आली; अकासा एअरच्या दिल्लीहून येणाऱ्या विमानाला अहमदाबादच्या दिशेने परत फिरावे लागले; ओमान एअरच्या मस्कटहून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय वाइड-बॉडी विमानाला बंगळुरूला वळवण्यात आले; आणि एअर इंडियाच्या कोलकाताहून येणाऱ्या विमानाला वडोदराला वळवण्यात आले. दुपारपर्यंत हवामान खराब झाल्याने नियंत्रकांना सामरिक अंतर आणि होल्ड पॅटर्न लागू करावे लागले.
नवी मुंबई विमानतळावर इंडिगोचे लँडिंग रद्द
मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका इंडिगो विमानाचे लँडिंग रद्द करण्याची वेळ आली. खराब हवामानामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान उतरवण्याऐवजी पुन्हा आकाशात झेपावण्याचा (‘गो-अराऊंड’) सुरक्षित निर्णय घेतला. या विमानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
