मुंबई : इराण-अमेरिका संघर्षामुळे मुंबईहून यंदाच्या मार्च महिन्यात एअर इंडिया आणि इंडिगो या दोन प्रमुख विमान कंपन्यांची गेल्या मार्चच्या तुलनेत उड्डाणांची संख्या कमी आहे. भारतीय विमानक्षेत्राचा विस्तार होत असताना मार्चमध्ये यंदा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या संख्येसह, प्रवासी संख्येत तसेच उड्डाणांच्या तासांमध्ये घट झाली आहे.

मार्च महिन्यात ”एअर इंडिया”च्या देशांतर्गत १५ हजार ७५९ , तर चार हजार १५४ आंतरराष्ट्रीय विमानांचे मुंबईहून उड्डाण झाले होते. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात देशांतर्गत १६ हजार ८५५ तर पाच हजार २२२ आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण झाले होते. एअर इंडियाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या तासांमध्येही यंदा घट नोंदवली गेली आहे.

यंदा देशांतर्गत प्रवासाचे ३२ हजार ६५८, तर आंतरराष्ट्रीय प्रवासाचे ३१ हजार ६९३ तास नोंदविण्यात आले आहेत. हाच आकडा गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ३४ हजारांहून अधिक होता. यंदाच्या मार्चमध्ये २९ लाख ४७ हजार प्रवाशांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. गेल्या वर्षी ही संख्या ३२ लाख ६८ हजार होती.

इंडिगोच्या विमानांची यंदा देशांतर्गत ५९ हजार ४९४, तर आंतरराष्ट्रीय पाच हजार २३८ उड्डाणे झाली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हे आकडे अनुक्रमे ६१ हजार ९५७ आणि आठ हजार २३१ होते. इंडिगोचे यंदा देशांतर्गत एक लाख सहा हजार २८१ तास, तर आंतरराष्ट्रीय उड्डाण २० हजार ८१६ तास झाले. गेल्या वर्षी हे आकडे अनुक्रमे एक लाख दहा हजार ३१९ तास आणि ३१ हजार ६५७ तास होते. प्रवासी संख्येतही हा बदल दिसत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी मिळून यंदा मार्चमध्ये ९९ लाख २८ हजार ४७२ प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षी एक कोटी पाच लाख ९८ हजार ४२ प्रवाशांनी ”इंडिगो”च्या माध्यमातून प्रवासाचा अनुभव घेतला होता.

पर्यटनाला फटका

विमान तिकिट दरांच्या वाढ झाल्याचा तिकीटदरांचा परिणाम यंदा परदेशी प्रवासावर झाला आहे. तसेच मार्चप्रमाणेच मे महिन्याच्या पर्यटनावर देखील काहीसा परिणाम झाला आहे. पर्यटनाबद्दल यंदा अपेक्षित प्रमाणात विचारणाही होत नसून नोंदणीत काही प्रमाणात घट झाल्याचे पर्यटन व्यावसायिक सांगतात.