मुंबई : मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१च्या पुनर्विकासाच्या कामामुळे २५ ऑक्टोबरपासून मुंबई विमानतळावरील २६५ साप्ताहिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करावी लागणार आहेत. २६५ विमानांचे उड्डाण नवी मुंबई विमानतळावरुन होणार आहे. यात परदेशी तसेच भारतीय विमान कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेसह आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी देखील विरोध केला आहे. टर्मिनस १ च्या पुर्नविकासासाठी मुंबई विमानतळावरील वाहतूक नवी मुंबई विमानतळावर हलविणे म्हणजे व्यापार आणि प्रवासासाठी जगाशी असलेले मुंबईचे संबंध तोडून टाकून शहराला संपवण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर टर्मिनल-१ (टी-१) आणि टर्मिनल-२ (टी-२) अशी दोन टर्मिनल आहेत. टी-१चा वापर सध्या देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी टी-२चा वापर केला जातो. टी-१ पुनर्विकासासाठी बंद करण्यात येणार असल्याने टी-२मधील स्लॉटचा वापर देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम होणार आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या अखत्यारितील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ४६ विमान कंपन्यांना २४ ऑक्टोबरच्या रात्री ११.५९ वाजल्यापासून विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रस्थान स्लॉटमध्ये ३३ टक्के कपात करण्यास सांगितले आहे. सध्या ४६ विमान कंपन्या टी-२ मधून दर आठवड्याला एकूण ७७० आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन करतात. २५ ऑक्टोबरपासून, म्हणजेच हिवाळी वेळापत्रक सुरू होत असताना, २६५ साप्ताहिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती बंद करण्यास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने विमान कंपन्यांना सांगितले आहे.
या नियोजित कपातीमुळे इंडिगो आणि एअर इंडिया यांना मुंबई विमानतळावरून अनुक्रमे ७४ आणि ३३ साप्ताहिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करावी लागणार आहेत. अकासा एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाइसजेटला अनुक्रमे सात आणि पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करावी लागणार आहेत. इतर विमान कंपन्यांमध्ये एतिहाद एअरवेज आणि एमिरेट्स यांना प्रत्येकी १० साप्ताहिक उड्डाणे कमी करावी लागणार आहेत. सध्या या दोन्ही कंपन्या मुंबई विमानतळावरून प्रत्येकी २८ साप्ताहिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवतात.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचा विरोध ९ सप्टेंबर रोजी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने नवी विमानतळावर जाण्याच्या या निर्णयाला ”सक्तीचे स्थलांतर” म्हटले असून मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.तसेच विमान कंपन्यांशी सल्लामसलत न करता हा निर्णय़ घेतल्याचे पत्रात नमूद केले आहे.
विमान कंपन्यांची पाठ
१६ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळ प्राधिकरणासोबत विमान कंपन्यांची एक बैठक बोलावली होती, परंतु ”अनेक विमान कंपन्या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. तसेच विमान कंपन्यांनी विमान बदलासंदर्भात माहितीही दिली नाही.
कोणत्या विमान कंपनीची किती विमाने स्थलांतरित एअर इंडिया एक्सप्रेस आणि ब्रिटिश एअरवेज मुंबई विमानतळावरून होणाऱ्या २१ साप्ताहिक उड्डाणांपैकी प्रत्येकी सात उड्डाणे नवी मुंबईला हलवणार आहेत. तर स्पाईसजेट, सिंगापूर एअरलाइन्स, कुवेत एअरवेज, थाई एअरवेज, व्हर्जिन अटलांटिक, ओमान एअर, इथिओपियन एअरलाइन्स, श्रीलंकन एअरलाइन्स, एअर अरेबिया, लुफ्थान्सा आणि गल्फ एअर या प्रत्येक कंपनीच्या १४ साप्ताहिक उड्डाणांपैकी पाच उड्डाणे स्थलांतरित करतील. इतर विमान कंपन्यांपैकी, केनिया एअरवेज, कॅथे पॅसिफिक आणि मलेशिया एअरलाइन्स त्यांच्या १० साप्ताहिक उड्डाणांपैकी प्रत्येकी चार उड्डाणे हलवतील, तर सौदिया तिच्या आठ उड्डाणांपैकी तीन उड्डाणे नवी मुंबई विमानतळावरुन होणार आहेत. स्विस, अझरबैजान एअरलाइन्स, ऑल निप्पॉन एअरवेज, जझीरा एअरवेज, बाटिक एअर मलेशिया, एअर फ्रान्स, व्हिएतजेट, तुर्कीश एअरलाइन्स, व्हिएतनाम एअरलाइन्स, सलामएअर, एअर टांझानिया आणि कतार एअरवेज या प्रत्येक विमान कंपन्या त्यांच्या सात साप्ताहिक उड्डाणांपैकी तीन उड्डाणे पुढे ढकलणार आहेत.केएलएम आपल्या सहापैकी दोन उड्डाणे स्थलांतरित करेल, तर फ्लायदुबई आणि इजिप्तएअर प्रत्येकी आपल्या पाचपैकी दोन उड्डाणे हलवतील. फ्लायनास आपल्या चारपैकी दोन उड्डाणे स्थलांतरित करेल, तर थाई व्हिएतजेट देखील आपल्या चारपैकी दोन उड्डाणे हलवेल. उर्वरित लहान विमान कंपन्या — एअर अस्ताना, एअर मॉरिशस, रॉयल जॉर्डनियन, नेपाळ एअरलाइन्स, उझबेकिस्तान एअरवेज, युगांडा एअरलाइन्स आणि येमेनिया — प्रत्येकी आपल्या दोन ते तीन साप्ताहिक उड्डाणांपैकी एक उड्डाण हलवतील.
प्रवाशांची गैरसोय
नवी मुंबई विमानतळ आधुनिक असले तरी सार्वजनिक वाहतूकीची व्यवस्था आजही अपुरी आहे. एकाच शहरात दोन विमानतळांवर विमान वाहतुकीसाठी शुल्क भरणे,विमान कंपन्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही,त्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळाकडे वाहतूक वळविण्यास नकार दिला आहे.त्यामुळे येत्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
जाणीवपूर्वक मुंबईला जगाशी तोडण्याचे काम—आदित्य ठाकरे भाजपच्या राजवटीत अनेक कंपन्या, उत्पादक आणि अगदी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रालाही मुंबईतून बाहेर गेल्या आहेत. याचा भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळ पाडून, भाजप जाणीवपूर्वक मुंबईची जगाशी जोडली जाण्याची क्षमता संपवू पाहत आहे.नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक ”प्लस वन” विमानतळ असायला हवे, केवळ प्रवाशांना गैरसोयीत ढकलून त्यांची लूटमार करणारे विमानतळ नव्हे.ही लूटमार कोणासाठी केली जात आहे?
