मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या इमारतींचा पुनर्विकास अन्य योजनेशी संलग्न करण्याच्या मागणीस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याबाबत आता लवकरच शासन निर्णय जारी केला जाणार आहे.
एअरपोर्ट फनेलवासीयांच्या पुनर्विकासाचा प्रश्न नोव्हेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्यात आलेली नव्हती. या परिसरात इमारतीच्या उंचीवर बंधने असल्यामुळे पुनर्विकास पूर्ण ठप्प झाला होता. सध्या उपलब्ध असलेल्या चटईक्षेत्रफळाइतके बांधकाम करून या बांधकामाचा खर्च निघेल इतका टीडीआर देण्याच्या प्रस्तावाबाबत एकमत झाले होते. परंतु तो टीडीआर खूपच कमी असल्यामुळे बांधकामाचा खर्चही वसूल होणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळातही घोषणा करुन, दहा मजल्यापर्यंत बांधकाम करता येईल, इतका टीडीआर देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. परंतु तोही निर्णय व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने याआधी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार विलेपार्ले व सांताक्रूझ परिसरासाठी अनुक्रमे ४.४८ व ४.९७, तर कुर्ला परिसरासाठी ९.२२ चटईक्षेत्रफळ प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु इमारतीच्या उंचीवर बंदी असल्यामुळे हे चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नव्हते. या निमित्ताने निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) इतरत्र वापरण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव होता. परंतु तो व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट करीत फेटाळण्यात आला होता.
या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्रफळवजा जाता उर्वरित चटईक्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणीही सरकारने मान्य केली होती. परंतु तीही व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले. या इमारतींचा पुनर्विकास विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(७), ३३(९) यानुसार अन्य योजनेशी संलग्न केला तरच पुनर्विकास मार्गी लागू शकतो, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे सध्या ज्या इमारती आहेत त्यांचा आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास आणि त्यातून निर्माण झालेला टीडीआर वा अतिरिक्त चटईक्षेत्रफळ अन्य योजनांत वापरणे हाच पर्याय असल्याचे मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मान्यता दिली आहे. तशी टिपण्णी आपल्याकडे आली असून याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल, असे गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आमदार विद्या ठाकूर यांनी फनेलवासीयांसोबत गुप्ता यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी त्यास दुजोरा दिला.
‘एअरपोर्ट फनेल’ म्हणजे काय?
सांताक्रूझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या उपनगरातील इमारतींना सांताक्रूझ आणि पवन हंस या विमानतळांचे फनेल झोन (विमानाचे उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गावरील परिसर) लागू आहेत. या फनेलमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम लागू आहेत. दोन ते तीन मजल्यांपर्यंतच उंचीची मर्यादा असल्यामुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रफळात या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करण्याची ऐपत नाही, अशा स्थितीत हे रहिवासी भरडले गेले आहेत.
टीडीआर म्हणजे?
एखाद्या भूखंडावर संपूर्ण चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नसते तेव्हा ते इतरत्र वापरण्याची मुभा दिली जाते. त्यालाच टीडीआर म्हणतात.
