मुंबई: विमानतळावरील सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवरुन शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अटक केलेल्या आरोपींचा फोटा प्रसिध्द करुन त्यांनी काही पश्न उपस्थित केले आहेत. चव्हाण यांचे वागणे, बोलणे, डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते. कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली. यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर काल रात्री मिळाले, असे राऊत यांनी म्हटले आहे.
चव्हाण हे मधल्या काळात अचानक मुंबई विमानतळावर कामगार संघटनेच्या कामात घुसले. त्यांनी इतर संघटना फोडून विमानतळावर नियंत्रण मिळवले. गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या व पोसल्या आणि आता त्याच लोकांना सोने तस्करी प्रकरणात अटक केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. याच्या खोलात जाऊन चौकशी केली तर भाजपा पैसा कुठून कमावतो, हे उघड होईल. अटक केलेल्या आरोपी बरोबर भाजपा अध्यक्ष हातमिळवणी करत आहेत, महाराष्ट्र या लोकांनी नासवलं आहे. फडणवीस, आता तरी गंभीर व्हा, असे त्यांनी म्हटले आहे.
