मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव, सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यातही, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक विमान टर्मिनल परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅब चालकांना नमाज पठण करण्याची परवानगी देऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात मांडली.
मानवतावादी दृष्टीकोनातून चालक आणि प्रवाशांना किमान रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी या परिसरातील एक जागा उपलब्ध करण्याचा विचार करा, असे आदेश न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला(एमएमआरडीए) दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी सरकारने उपरोक्त भूमिका मांडली. त्यावर, ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आणि याचिकाकर्त्यांचे सदस्य नमाज अदा करू शकतील असे इतर कोणतेही क्षेत्र उपलब्ध करता येईल का ते पाहा, असे आदेश न्यायालयाने सरकार आणि एमएमआरडीएला दिले. फक्त रमजान दरम्यान त्यांना नमाज अदा करण्याची परवानगी दिली जाईल आणि रमजान संपल्यानंतर, तात्पुरती शेड पाडली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकेकडे प्रतिकूल दृष्टीने पाहू नका. सरकार म्हणून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी जागा शोधण्यास आम्ही तुम्हाला सांगत असून सुरक्षेशी तडजोड करायला सांगत नाही, असेही न्यायालयाने सुनावले.
तत्पूर्वी, स्थानिक विमान टर्मिनलहून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे, त्या ठिकाणी रमजान महिन्यापुरती तात्पुरती शेड नमान पठणासाठी उपलब्ध करणे धोक्याचे ठरू शकते. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थापनाचे अन्य प्रश्नही उद्भवू शकतात. त्यामुळे, संबंधित ठिकाणी नमाज पठण करण्याची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, असे सरकार आणि एमएमआरडीएतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
विमानतळ परिसर हा एक उच्च-सुरक्षा क्षेत्र आहे. पोलिसांना विमानतळ आणि जवळच्या परिसराची सुरक्षा व्यवस्थापित करावी लागते. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्यासाठी १५०० ते २००० जण येतात. इतक्या मोठ्या संख्येने नमाज पठण केले जाणार असेल तर, पोलिसांना पाच वेळा या ठिकाणी सुरक्षा राखणे कठीण होईल आणि विमानतळाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होईल. त्यातच, विमानतळ अधिकाऱ्यांना गेले वर्षभर बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळत आहेत. म्हणूनही, वाहनचालकांना नमाज पठण करण्याची परवानगी देणे शक्य होणार नाही हे पुन्हा एकदा सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
दुसरीकडे, संबंधित जागा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ आहे. तथापि, या जागेपासून काही अंतरावर तीन वेगवेगळ्या मशिदी आहेत आणि काही मिनिटांतच तिथे पोहोचता येते, अशी माहिती विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंगतर्फे न्यायालयाला देण्यात आली. एक मशीद एक किमी अंतरावर आहे आणि १३ मिनिटांत तिथे पोहोचता येते, तर दुसरी १.३ किमी अंतरावर आहे आणि तिथे चालत जाण्यासाठी किमान १८ मिनिटे लागतात. तिसरी मशीद ३ ते ४ किमी अंतरावर आहे. सध्या तिन्ही मशिदी कार्यरत आहेत, असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले.

