मुंबई : अदानी समूह संचालित मुंबई विमानतळावरील निकोटीन पाकिटांच्या विक्रीवर घातलेल्या बंदीप्रकऱणी संबंधित उत्पादन ‘औषध’ कायद्याच्या कक्षेत मोडते की नाही या मुद्याबाबत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. त्याचवेळी, निकोटीन पाकिटे ही ‘अमली पदार्थ’ आहेत की नाही ? याबाबतचा निर्णय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. शुल्क-मुक्त (ड्युटी-फ्री) दुकानांना देशांतर्गत नियमन कायद्यांतर्गत कोणतीही सूट मिळत नसल्याचेही निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

विक्रेत्या याचिकाकर्त्यांनी चार आठवड्यांत निकोटीन पाकिटांची संपूर्ण उत्पादन माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले म्हणणे सीडीएससीओकडे सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने दिले, ही माहिती मिळाल्यानंतर सीडीएससीओने ३० दिवसांत कारणांसह लेखी आदेश देऊन निकोटीन पाऊच हे औषध कायद्याच्या कक्षेत येतात की नाही हे ठरवावे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

दरम्यान, मुंबईतील आंतरराष्ट्रीय टर्मिनलमध्ये केवळ परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना विक्री केली जाते आणि त्यामुळे हा माल ‘पुन्हा निर्यात’ मानावा, असा विक्रेत्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करण्यास नकार दिला. माल भारतीय हद्दीत प्रवेश करताच त्याची ‘आयात’ होते आणि त्यामुळे भारतीय कायद्यांतील आयातविषयक निर्बंध लागू होतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, भारतात मालाची आयात ही केवळ साठवणूक किंवा पुनर्निर्यातीच्या मर्यादित उद्देशाने केली जाते, तरीही ती देशांतर्गत कायद्यांच्या अंमलबजावणीतून मुक्त असू शकत नाही, असेही न्यायालयाने या निर्णय़ात हस्तक्षेप करण्यास नकार देताना नमूद केले.

प्रकरण काय ?

”ड्रग्ज कंट्रोलर जनरल”च्या अधिकाऱ्यांनी ”झिन” आणि ”फॉक्स” या ब्रँड नावाखालील आयात निकोटीन पाऊचेसच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विक्रीवर यावर्षी एप्रिलमध्ये बंदी घातली. त्या बंदीला ”मुंबई ट्रॅव्हल रिटेल लिमिटेड” आणि ”फ्लेमिंगो ड्युटीफ्री शॉप प्रायव्हेट लिमिटेड” या कंपन्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.