मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढती गर्दी, एकाच वेळी दोन विमाने उडू न शकणाऱ्या छेदणाऱ्या धावपट्ट्या आणि हवाई वाहतूक नियंत्रण समस्यांमुळे विमानांच्या वक्तशीरपणात मोठी घसरण झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मे महिन्याच्या अहवालानुसार, मुंबई विमानतळ देशातील सर्वात कमी वक्तशीर विमानतळांपैकी एक ठरले आहे. मुंबईचा वक्तशीरपणा ७०.५ टक्के नोंदविण्यात आला आहे.
देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा क्रमांक दुसरा आहे. दिवसाला १ हजार विमानांची ये-जा आणि प्रवाशांच्या वर्दळीमुळे दिवसभर हा परिसर गजबजलेला असतो. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने विमान संचलनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे समांतर धावपट्ट्या असलेल्या इतर विमानतळांप्रमाणे येथून एका वेळी दोन विमानांचे उड्डाण करता येत नाही.
एका धावपट्टीवर विमानाची आगमन वा प्रस्थान प्रक्रिया सुरू असताना दुसरी धावपट्टी बंद ठेवावी लागत असल्याने पीक अवरमध्ये मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडते. वक्तशीरपणासंदर्भात देशातील १० विमानतळांच्या यादीत मुंबई विमानतळ शेवटच्या स्थानावर आहे. चेन्नई विमानतळ पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा वक्तशीरपणा ९२.२ टक्के, तर मुंबईचा वक्तशीरपणा ७०.५ टक्के नोंदविण्यात आला आहे.
वक्तशीरपणा ढासळण्याची प्रमुख कारणे
मर्यादित धावपट्टी क्षमता: समांतर धावपट्ट्या नसल्यामुळे येथे एकावेळी एकच उड्डाण किंवा आगमन शक्य होत नाही, ज्यामुळे पीक अवर्समध्ये विमाने आकाशात रेंगाळतात.
तांत्रिक बिघाड – अपुरे मनुष्यबळ : विमान कंपन्यांचे अंतर्गत प्रश्न, कर्मचारी टंचाईचा फटका विमानांच्या वेळेला बसतो. तसेच अनेकदा विमानात तांत्रिक बिघाड होतात.
क्षमता ओलांडलेली उड्डाणे: विमानतळ दररोज सुमारे १ हजार विमानांची वाहतूक हाताळते, ज्यामुळे क्षमतेवर ताण येतो.
हवामानातील अडथळे: अतिवृष्टी, धुके आणि खराब हवामानामुळे धावपट्टीचे कामकाज काही काळासाठी थांबवावे लागते, ज्यामुळे विलंबाचा कालावधी वाढतो.
हवाई वाहतूक नियंत्रण : हवाई वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमानांना हिरवा कंदील मिळण्यास विलंब होतो.
