मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमाकांचे व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबई विमानतळामधून बाहेर पडायला दीड तास लागत आहे. विमान वेळेवर आले तरी प्रवाशांच्या वेळेत बचत होत नसल्याची नाराजी एअर इंडियाच्या एका प्रवाशांने व्यक्त केली.
मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवासावर निरुपमा कोडू या महिला प्रवाशाने एक्स (X) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये टीका केली आहे. विमानातून उतरताना शिडीचा वापर, टर्मिनल १ ते टर्मिनल २ पर्यंतचा बसने २० मिनिटांचा प्रवास आणि सामान मिळण्यास झालेला विलंब यांसारख्या अनेक समस्यांचा आपल्या तक्रारीत उल्लेख केला आहे. निरुपमा कोडू यांनी विमानतळाबाहेर पडायला जवळपास ९० मिनिटे लागल्याचे नमूद केले आहे.
निरुपमा यांनी विमानातून उतरून बसमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. विशेषतः वृद्ध प्रवासी, गुडघ्याची समस्या असलेले प्रवासी आणि हातातील सामान घेऊन प्रवास करणाऱ्यांसाठी पायऱ्यांनी खाली उतरणे आव्हानात्मक आहे. जिथे एअरब्रिज उपलब्ध नाहीत, तिथे इंडिगोने वापरलेल्या रॅम्प-आधारित प्रणालीचा वापर एअर इंडियाने करावा, असे सुचविले आहे.
आगमन टर्मिनलवर पोहोचण्यास होणाऱ्या विलंबाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विमान टर्मिनल १ वर उतरले, तरी प्रवाशांना टर्मिनल २ वर नेण्यात आले. ज्यामुळे बस प्रवासाला २० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला. विमान वेळेवर पोहोचले, तरी टर्मिनलवर पोहोचण्यास आणि सामान गोळा करण्यास होणाऱ्या विलंबामुळे त्रास होतो. विमान रात्री अंदाजे ८:१० वाजता धावपट्टीवर उतरले, तरी सामान बेल्टवर रात्री ९:१० च्या सुमारास येऊ लागले. त्यांची बॅग रात्री ९:१८ वाजता मिळाली. ती बाहेर पडली तरी अनेक प्रवासी अजूनही त्यांच्या सामानाची वाट पाहत होते. टर्मिनल १ ते टर्मिनल २ या इंटर-टर्मिनल ट्रान्सफरमुळे सामानाला वेळ लागतो. विमान उतरल्यापासून पार्किंग एरियापर्यंत पोहोचायला जवळपास दीड तास लागला. या घटनेमुळे व्यस्त विमानतळांवरील प्रवाशांची सोय आणि टर्मिनल्समधील समन्वयाबद्दल चिंता निर्माण झाली असून, अधिक सुरळीत ग्राउंड हँडलिंगची गरज अधोरेखित झाली आहे.
