जर तुम्ही दोन दिवसांमध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून कुठे बाहेर जाण्यासाठी विमान पकडण्याच्या विचारात असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण दि. 9 आणि 10 एप्रिल रोजी दुपारी सहा तासांसाठी विमानतळाच्या धावपट्टीचे काम करण्यात येत असल्याने विमानतळ बंद असणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत विमानतळाच्या धावपट्टीचे काम करण्यात येत असल्याने 8 व 9 एप्रिल रोजीचे औरंगाबाद येथून दिल्ली येथे जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे दिल्लीच्या विमानांसह औरंगाबाद ते मुंबई तसेच मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांनाही दोन दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

मुंबई विमानतळाशिवाय चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ 12 मे ते 31 मे पर्यंत बंद असणार आहे. कालीकट विमानतळ 15 जून रोजी दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद असणार आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील 31 मे रोजी रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद असणार आहे.