मुंबई : उन्हाच्या तीव्रतेपासून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने खास स्मार्ट कुलिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. विमानतळ परिसरास खास सेन्सर्सचे जाळे तयार केल्याने प्रवाशांना कडक उन्हापासून दिलासा मिळत आहे.

विमानतळाच्या टर्मिनलसारख्या अवाढव्य आणि वर्दळीच्या ठिकाणी सर्वत्र एकसमान थंड हवा राखणे हे एक आव्हान आहे. तरीही, उन्हाळ्याच्या काळातही येथील तापमान २३ अंश सेल्सिअसवर (±१ अंश सेल्सिअस) काळजीपूर्वक नियंत्रित केले जाते. ज्यामुळे आतील वातावरण पहाटेसह रात्रीच्या वेळी स्थिर राहते. दोन्ही टर्मिनलमध्ये पसरलेल्या सेन्सर्सच्या जाळ्यामुळे आणि हिटींग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग नियंत्रण यंत्रणा यांसारख्या सर्वोत्तम यंत्रणांमुळे शक्य होते. यामध्ये टर्मिनल १ मध्ये ६८ तापमान सेन्सर्स, तर टर्मिनल २ मध्ये १७२ तापमान सेन्सर्स बसवली आहेत. सेन्सर्स सतत तापमानाचा मागोवा घेऊन, आवश्यकतेनुसार बदल करतात.

उच्च-क्षमतेच्या एचव्हीएसी यंत्रणेमध्ये वॉटर-कुल्ड चिलर्स (पाण्याचा वापर करून हवा थंड करणारी यंत्रे), व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह्स (बदलत्या गरजेनुसार वेग नियंत्रित करणारी यंत्रे), ईसी फॅन्स आणि मागणीवर आधारित थंड पाण्याच्या प्रवाहाचे व्यवस्थापनाचा समावेश आहे. जे टर्मिनलच्या गरजेनुसार कूलिंग क्षमता अधिक कार्यक्षम बनवतात.

एअर कर्टन्स

दिवसभरात प्रवेशद्वारे अनेकदा उघड-बंद होत असतानाही आतील थंड हवा आतच टिकून राहावी, यासाठी विमानतळाने प्रत्येक टर्मिनलवरील आत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या प्रवेशद्वारांवर एअर कर्टन्स बसवले आहेत. ही यंत्रणा हवेचा भिंतीसारखा अडथळा तयार करते, ज्यामुळे आतील गारवा बाहेर जात नाही. आतील तापमान स्थिर राहून गर्दीच्या वेळी एचव्हीएसी सिस्टमवरील ताण कमी होतो. प्रत्येक टर्मिनलचा आकार आणि प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन टर्मिनल १ मध्ये ७६, तर टर्मिनल २ मध्ये २४८ एअर कर्टन्स बसवले आहेत.

उष्णतारोधक वैशिष्ट्ये

मुंबई विमानतळाच्या टर्मिनलचे बांधकाम उच्च दर्जाचे असून सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी दुहेरी काचेच्या थरांचा आणि उच्च कार्यक्षमतेचे टिंटेड ग्लेझिंगचा वापर केला आहे. ही वैशिष्ट्ये बाहेरील कडक ऊन आणि प्रखर प्रकाश रोखण्यास मदत करतात, तर दुसरीकडे दिवसाचा नैसर्गिक प्रकाश इमारतीमध्ये पुरेसा येऊ देतात.

व्यवहार्यता

पारंपरिक बेल्टवर चालणाऱ्या पंख्यांऐवजी इलेक्ट्रॉनिकल कम्युटेटेड (ईसी) फॅन्स बसवले आहे. यामुळे वार्षिक जवळपास १.६ दशलक्ष युनिट्सपर्यंत विजेची बचत झाली असून ऊर्जा वापरात २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. विमानतळाची एचव्हीएसी सिस्टमसह सर्व ऑपरेशन्स सध्या १०० टक्के हरित ऊर्जेवर चालतात. एचव्हीएसी सिस्टममध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (एसटीपी) शुद्ध केलेले पाणी, तसेच, टर्मिनल २ च्या एअर हँडलिंग युनिट्समधून जमा होणारे कंडेन्सेट पाणी चिलर सिस्टममध्ये पुनर्वापर केले जाते. यामुळे ताज्या पाण्यावरिल अवलंबन लक्षणीयरित्या कमी होते आणि कार्यक्षम कूलिंग मिळते.

उत्कृष्ट हवेचा दर्जा

तापमान नियंत्रणासह टर्मिनलमध्ये उत्कृष्ट हवेचा दर्जा राखण्यालाही प्राधान्य दिले आहे. हवेची शुद्धता वाढवण्यासाठी हवा खेळती ठेवणाऱ्या सर्व यंत्रणांमध्ये यूव्ही लॅम्प्स बसवले आहेत. तसेच, विमानतळाच्या आत मोठ्या प्रमाणावर हिरवळ आणि झाडे लावली आहेत.