मुंबई : मुंबई विमानतळ टर्मिनल १ वरून बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे उड्डाण करणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानांची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रात्र विमानतळावरच काढावी लागली. काही उड्डाणांना विलंब आणि काही उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीकडून योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोपही प्रवाशांनी केला.
मुंबईहून बुधवार, २९ एप्रिल रोजी निघणाऱ्या स्पाईसजेटची काही विमाने रद्द झाली. खराब हवामानामुळे मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना विलंब झाला. तर एसजी ६३१ मुंबई- दिल्ली, एसजी ५५३ मुंबई-गोरखपूर आणि एसजी ६६९ मुंबई-बंगळुरूला जाणारी स्पाईसजेटची तीन विमाने तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली होती. एक विमान थांबवून ठेवण्यात आले होते, तर बागडोगरा येथील प्रतिकूल हवामानामुळे एका विमानाला फटका बसला. रद्द झालेल्या उड्डाणांची भरपाई करण्यासाठी, बाधित प्रवाशांना सामावून घेण्यासाठी गुरुवार, ३० एप्रिल रोजी अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात आली.
स्पाईसजेटची विमाने रात्री उशिरा सुटली, मात्र विमाने रद्द झाल्याने शेकडो प्रवासी विमानतळावरच खोळंबले होते. जवळपास नऊ तास उशिरा सुटणाऱ्या रात्रीच्या उड्डाणांपासून ते ऐनवेळी रद्द झालेल्या उड्डाणांपर्यंत, प्रवाशांना संभ्रम, प्रचंड गर्दी आणि संवादाचा अभाव यांचा सामना करावा लागला. मुंबई विमानतळावर रात्रभर गोंधळाचे वातावरण होते. ज्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. सोशल मीडियावर प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, ६ तासांचे उड्डाण थेट १८ तासांनी दाखवले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
कर्मचारी गायब
विमातळावर प्रवासी आपले सामान घेऊन लांब रांगेत उभे
होते. मात्र विमान कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना कोणतीही माहिती मिळत नसल्याने प्रवासी संतापले होते. प्रवाशांना पाणी देण्यासाठी देखील कर्मचारी उपस्थित नव्हते.
प्रवासी नाराज
या घटनेमुळे स्पाईस जेट विमान कंपनीच्या परिचालन विश्वासार्हतेबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे. डीजीसीएच्या अलीकडील आकडेवारीनुसार भारतीय विमान कंपन्यांमध्ये स्पाईसजेटची वेळेवर उड्डाण करण्याची कामगिरी सर्वात कमी आहे.
