मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबईहून विविध ठिकाणी जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानांना विलंब होत आहे. विमानांच्या उड्डाणांना विलंब होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना ३० एप्रिलची रात्र मुबई विमानतळावरच काढावी लागली होती. त्यानंतर २४ आणि २५ मे रोजी सलग दोन दिवस स्पाईस जेटची विमान सेवा रखडली होती. प्रवाशांचे सामान जास्त झाल्यास तात्काळ दंड आकारण्यात येतो. त्याच धर्तीवर विमान उड्डाणांचा वांरवार खोळंबा होत असलेल्या कंपन्यांवर डीजीसीएने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मुंबई विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्सस्त विमानतळ आहे. या विमातळावरून दररोज सुमारे ९०० विमानांच्या माध्यमातून दीड लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, २९ एप्रिल रोजी निघणारी स्पाईसजेटची काही विमाने रद्द झाली होती. खराब हवामानामुळे मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना विलंब झाला होता. तर ‘एसजी ६३१’ मुंबई- दिल्ली, ‘एसजी ५५३’ मुंबई-गोरखपूर आणि ‘एसजी ६६९’ मुंबई-बंगळुरूला जाणारी स्पाईसजेटची तीन विमाने ‘तांत्रिक कारणांमुळे’ रद्द झाली होती. एक विमान जमिनीवर थांबवून ठेवल्याने (ग्राउंडिंग) आणि बागडोगरा येथील प्रतिकूल हवामानामुळे एका विमानाला फटका बसला होता. रद्द झालेल्या उड्डाणांची भरपाई करण्यासाठी, बाधित प्रवाशांसाठी गुरुवार, ३० एप्रिल रोजी अतिरिक्त उड्डाणे चालवण्यात आली होती. दरम्यान, उड्डाणांना विलंब आणि काही उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता.
सोमवारी, २५ मे रोजी विमानाच्या परिचालन समस्येमुळे उड्डाणास विलंब झाल्याने अहमदाबादला जाणाऱ्या स्पाईसजेट विमानातील प्रवासी मुंबई विमानतळावर पाच तासांहून अधिक काळ अडकून पडले होते. मुंबईहून दुपारी ४.३५ वाजता सुटणारे विमान ‘एसजी ८८०’ रात्री ९.४३ वाजता उड्डाण करून रात्री १०.३२ वाजता अहमदाबादमध्ये उतरले होते. फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, याच विमानाला रविवार,२४ मे रोजी याहूनही जास्त विलंब झाला होता. मुंबईहून रात्री ११.२४ वाजता निघून विमान मध्यरात्री १२.१५ वाजता अहमदाबादला पोहोचले होते. मध्यरात्री उशिरा अहमदाबादला पोहोचल्याने प्रवाशांचे प्रवासाचे वेळापत्रक पुरते कोलमडले होते. याबाबत स्पाईसजेटच्या माध्यम प्रतिनिधींकडून विमान विलंबाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळाली नाही.
प्रवाशांचे हाल
विमानांना विलंब झाल्यास प्रवासी तासन््तास विमानतळावर अडकून पडतात. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. याशिवाय अनेक प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन फसते. पूर्वनियोजित कामे वेळे अभावी होत नाहीत.
