मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ च्या धावपट्टी परिसरात गुरुवारी संध्याकाळी आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन यंत्रणा आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानी झाली नसली तरी विमानतळावरील प्रवेश द्वार (गेट) बंद करण्यात आल्याने काही वेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळावरून दिवसाला सुमारे एक हजार विमानाची ये – जा होते. टर्मिनल १ वरून विशेषकरून देशातर्गत विमान सेवा होते. गुरुवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास टर्मिनल १ च्या धावपट्टी जवळ आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. खबरदारी म्हणून तात्काळ विमान वाहतूक थांबविण्यात आली होती.

विमानतळासारख्या हाय-सिक्युरिटी झोनमध्ये आगीची बातमी पसरताच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मुंबई विमानतळावरील प्रवेशद्वार तासाभर बंद करण्यात आले होते. टर्मिनल १ वरील काही विमानांची उड्डाणे खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ थांबवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.