मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुनर्विकासामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी जवळपास ३० टक्के उड्डाणे येत्या १ ऑक्टोबरपासून नवी मुंबई विमानतळावरुन चालविण्यात येणार आहेत. परिणामी पूर्व-पश्चिम उपनगरासह इतर मुंबईकर प्रवाशांना हवाई प्रवासासाठी नवी मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर हवाई प्रवाशांची संख्या जास्त असते. विमान प्रवासासाठी नवी मुंबई विमानतळापर्यत प्रवास करावा लागणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. मुंबई विमानतळवरुन सकाळच्या वेळेतील दिल्ली, बंगळुरू तसेच दुपारच्या वेळेतील कोचीनला जाणारे विमान सध्या नवी मुंबई विमानतळावर वळवले आहे.

दरम्यान नवी मुंबईविमानतळ प्रवाशांसाठी अजूनही सोईस्कर झालेले नाही. स्वतःचे वाहन असलेल्या प्रवाशांना नवी मुंबईपर्यंतचा प्रवास शक्य असला, तरी ठाणे, पूर्व आणि पश्चिमउपनगरांसह मुंबईच्या अन्य भागांतून सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्यांना नवी मुंबई विमानतळ गाठणे आजही काहीसे त्रासदायक आहे. नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी प्रवाशांना खासगी टॅक्सीशिवाय पर्याय नाही. टॅक्सीकरिता प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतात.सध्या मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, अकासा

विमानांचे उड्डाण आता नवी मुंबईहून होत आहे. सकाळच्या वेळची ही विमाने नवी दिल्ली येथे एक दिवसीय बैठकांसाठी, कॉपरिटमधील कर्मचाऱ्यांना सोयीची आहेत. पण आता हीच विमाने गाठण्यासाठी दोन ते अडीच तासांचा अधिकचा प्रवास करावा लागणार आहे. अकासा एअरचे सकाळी ११.३०ला मुंबईहून कोचीनला जाणाऱ्या विमानाला प्रवाशांसह पर्यटकांची मागणी आहे. मात्र, आता हे विमान नवी मुंबईला नेल्याने पर्यटक तिथे जायला उत्सुक नसल्याचे पर्यटन व्यावसायिक सांगतात.

नवी मुंबई ऐवजी मुंबई विमानतळावरुन उपलब्ध असलेल्या दुसऱ्या पर्यायाकरिता प्रवाशांची विचारणा होत आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सकाळच्या वेळचे विमान बेंगळुरूला थांबून मग दिल्लीला जात होते. ते बेंगळुरूला जाणाऱ्यांसाठी सोयीचे होते. इंडिगोचेही बेंगलुरूचे सकाळचे ७.०५ विमान नवी मुंबईहून सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे भविष्यात मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा ताण कमी होणार असला, तरी सध्या विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. २५ ऑक्टोबरपासून, टर्मिनल १ वरील एक-तृतीयांश उड्डाणे टर्मिनल २ वर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या विमानतळावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने लोडर, चालकांच समावेश आहे.