मुंबई: विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या अतिथींच्या निवासाची व्यवस्था आता मुंबई विमानतळाशेजारीच होणार आहे. यसाठी मुंबई विमानतळाशेजारी विलेपार्ले येथे सरकारकडून सहा मजली ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारण्यात येणार आहे. सर्वसुविधांनी युक्त अशा ३९ खोल्या तसेच ४२ पार्किंकच्या व्यवस्थेसह हे अतिथीगृह उभारण्यात येणार आहे.

नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता . हांडे आदी अधिकारी उपस्थित होते. राजा अदारे आर्किटेक्ट यांच्याकडून प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री रावल यांनी आराखड्याची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.

अतिथीगृहात वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. प्रस्तावित अतिथीगृहाची इमारत चार तळघरांसह सहा मजली असणार आहे. अतिथींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीही याच इमारतीत स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मंत्री रावल यांनी दिले. प्रस्तावित अतिथीगृहाचा अंतिम आराखडा लवकर सादर करून बांधकामाची पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

असे असेल अतिथीगृह

स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्षासह ४२ वाहन क्षमतेच्या वाहनताळासह अतिथींसाठी एकूण ३९ खोल्या प्रस्तावित असून, त्यात कार्यकारी कक्ष आणि अध्यक्षीय कक्षाचाही समावेश आहे. पहिल्या मजल्यावर दोन परिषद कक्ष, एक बोर्ड रूम, मुख्य स्वयंपाकघर तसेच जनरल आणि खासगी स्वयंपाकगृहाची सुविधा असेल. दुसऱ्या ते सहाव्या मजल्यावर अतिथींच्या निवासासाठी खोल्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.