मुंबई : रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा गाजावाजा सुरू असतानाच, नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून मुंबईतील प्रमुख स्थानकांवरील मूलभूत प्रवासी सुविधांची दुरवस्था उघड झाली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), ठाणे, कल्याण व मुंबई सेंट्रल या चारही स्थानकांचा ‘कॅग’च्या तपासणीतील ‘अमृत भारत’ स्थानकांमध्ये समावेश होता. मात्र, या स्थानकांवर पिण्याचे पाणी, आसनव्यवस्था, पंखे, शीतजल यंत्रणा व स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांमध्येच त्रुटी आढळल्या.

‘कॅग’च्या ‘भारतीय रेल्वेमधील उपनगरीय नसलेल्या रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छता’ या अहवालात देशभरातील ५१२ स्थानकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४५८ स्थानकांवर म्हणजेच ८९ टक्क्यांहून अधिक स्थानकांवर किमान अत्यावश्यक प्रवासी सुविधांमध्ये त्रुटी आढळल्या. त्यात पिण्याचे पाणी, आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, फलाटाचे छत, पंखे, वॉटर कूलर व दिशादर्शक फलकांचा समावेश आहे.

मुंबईतील ‘अमृत’ स्थानकांची स्थिती

  • ‘कॅग’च्या तपासणीत सीएसएमटीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळांची संख्या अपुरी, आसनव्यवस्था, शौचालयांमध्ये त्रुटी आढळल्या.
  • मुंबई सेंट्रलवर पिण्याचे पाणी, पंखे व शीतजल यंत्रणेची कमतरता नोंदवण्यात आली.
  • ठाणे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ, शौचालयांची कमतरता आढळली.
  • कल्याण स्थानकावर पिण्याचे पाणी व शीतजल यंत्रणा या सुविधांमध्ये त्रुटी असल्याचे अहवालात नमूद आहे.
  • सीएसएमटी, ठाणे, कल्याण व मुंबई सेंट्रल ही सर्व स्थानके एनएसजी-१ श्रेणीतील उच्च उत्पन्न व मोठ्या प्रवासी संख्येची स्थानके आहेत. तरीही मूलभूत सुविधांमध्ये कमतरता आहेत.

देशभरात पंखे, वॉटर कूलर व पाण्याची वानवा

देशभरातील ५१२ स्थानकांच्या संयुक्त तपासणीत पंख्यांमध्ये ४२ टक्के, वॉटर कूलरमध्ये ४० टक्के आणि पिण्याच्या पाण्याच्या नळांमध्ये २७ टक्के कमतरता आढळली. याशिवाय स्वच्छतागृहांत २२ टक्के, आसनव्यवस्थेत १५ टक्के, फलाटावरील छतांमध्ये १३ टक्के आणि शौचालयांत १२ टक्के त्रुटी आढळल्या.

‘अपंग’ प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची अंमलबजावणी अत्यंत निराशाजनक आहे. ५८ टक्के स्थानकांवर अपंगांसाठी योग्य उंचीचे पाण्याचे नळ नाहीत, तर ४४ टक्के स्थानकांवर उताराची (रॅम्प) योग्य सोय नाही.

‘अमृत’च्या कामांमुळे तपासणीला मर्यादा

कॅगच्या अहवालातील एक महत्त्वाची बाब म्हणजे अमृत भारत स्थानकांवर पुनर्विकासाची कामे सुरू असल्याने त्यांची तीन महिन्यांनंतरची फेर तपासणी करण्यात आली नाही. मात्र, सुरुवातीच्या संयुक्त तपासणीत ५१२ स्थानकांपैकी १८७ अमृत भारत स्थानकांचा समावेश होता. त्यामुळे अमृत भारत स्थानकांमध्येही मूलभूत सुविधांच्या त्रुटी असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

कायापालट कागदावरच

रेल्वे स्थानकांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी कोट्यवधींची कामे सुरू असताना प्रवाशांना पिण्याचे पाणी, बसण्यासाठी पुरेशी आसने, पंखे, शीतजल यंत्रणा व स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे ‘कॅग’च्या निष्कर्षांतून स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबईतील प्रमुख अमृत भारत स्थानकांचा विकास केवळ सुशोभीकरणापुरता न राहता प्रवाशांना प्रत्यक्ष वापरता येतील अशा मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

चाचणी संचाची कमतरता

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या चार स्थानकांवरील शीतजल यंत्रणेतील पाण्यात ई-कोलाय जीवाणू आढळल्याचे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले. पाण्याची वर्षातून किमान दोनदा तपासणी करण्याचा नियम असतानाही मध्य रेल्वेच्या २८ स्थानकांवर पाण्याची तपासणी करण्यासाठी आवश्यक चाचणी संच उपलब्ध नसल्याचे कॅगच्या पाहणीत आढळले आहे. ई-कोलाय जीवाणू हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो.

रेल्वेची जलशुद्धीकरण मोहीम

‘कॅग’च्या अहवालानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. वॉटर कूलरसह सुमारे २० हजार ठिकाणी ‘टँक टू टॅप’ जलशुद्धीकरण व देखरेख प्रणाली बसविण्यात येणार असून, पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता, स्रोत आणि आऊटलेटवर गुणवत्ता तपासणी; तसेच केंद्रीकृत देखरेखीवर भर दिला जाणार आहे. या उपाययोजनांवर रेल्वे मंडळ स्तरावर थेट देखरेख ठेवली जाणार आहे.