मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरात रविवारी पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत होत्या. विशेषत: उपनगर परिसरात पाऊस अधिक होता. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात गुरुवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.गेल्या आठवड्यात तयार झालेल्या दोन्ही कमी दाब क्षेत्राचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी त्यामुळे सध्या राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे.
मुंबईतही शनिवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. याचबरोबर रविवारीही अनेक भागात हलक्या सरी बरसल्या. पवई, वांद्रे, अंधेरी, भायखळा या भागात पहाटे पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर साधारण सकाळी ११ नंतर पावसाचा जोर वाढला. याचबरोबर ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागला नाही. मात्र, रविवार असल्याने बाहेर फिरायला जाण्याच्या बेतात असलेल्या मुंबईकरांचा हिरमोड झाला. याचबरोबर रविवारी महिला विश्वचषक सामन्यानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली.
नवी मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर होता. मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईत अधिक पाऊस पडत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी २६.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २३.८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. कुलाबा केंद्रात रविवारी २७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात सरासरीपेक्षा ७.३ अंशांनी कमी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात गुरुवारपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे काही दिवस तरी मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे.
राज्यातील इतर भागातही पावसाची शक्यता
मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागातही पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलक्या सरींची शक्यता आहे. फारसा पाऊस पडला नाही तरी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील तीन – चार दिवस पावसाचे वातावरण राहील.
