मुंबई: अंधेरीत एका दुचाकीस्वाराने बेदरकारपणे गाडी चालवून मांजरीच्या पिल्लाला धडक दिली. या घटनेत मांजरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी दुचाकीस्वाराला ओशिवरा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास अंधेरी पश्चिमेच्या लोखंडवाला परिसरातील फूड इन हॉटेल जवळ एका दुचाकीस्वाराने मांजरीच्या पिल्लाला धडक दिली. बेदरकारपणे दुचाकी चालवून त्याने मांजरीच्या अंगावर दुचाकी घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही बाब या परिसरात राहणारे प्राणी मित्र परिक्षित पंजाबी (३९) यांना समजली.
त्यांनी घटनास्थळावर जाऊन दुचाकीस्वार अरमान खान (२७) याला जाब विचारला. दरम्यान, या धडकते मांजरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला होता. स्थानिकांनी मांजरीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला ओशिवरा पोलीस ठाण्यात आणले.ओशिवरा पोलिसांनी अरमान खान विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११ (१) तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.