मुंबई : अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात हायड्रो गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये आहे. पेपर बॉक्स रोडवरील जे. के. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात २९ ऑक्टोबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना रात्री सुमारे ७.५० वाजता दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका तरुणाने हातातील लाल रंगाची प्लास्टिकची पिशवी लपवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात हायड्रो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे एकूण वजन १ किलो ८९६ ग्रॅम असून, त्याची बाजारातील अंदाजित किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये आहे. या प्रकरणी ओंकार राजेंद्र पवार (२८.सातारा) आणि पियुष मधुकर घोंगडे (२२. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही हा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात विक्री, वाहतूक आणि व्यापारासाठी बाळगत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा
नोंदविण्यात आला आहे. या अंमली पदार्थाचा पुरवठा कोठून झाला, तो मुंबईत कोणाला विक्रीसाठी आणण्यात आला होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा पुढील तपास सुरू आहे.
