Mumbai real estate trends 2026 show massive hike as 1.2 lakh rent video goes viral : स्वप्नाची नगर असलेल्या मुंबईत हक्काचं घर असावं असं इथे राहणाऱ्या प्रत्येकाला वाटतं. भलंमोठ नसलं तरी छोटंसं, चार माणसं राहतील असं ऐटदार घर घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. मुंबईतील रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना येथे घर भाड्याने घेऊन राहणंही कठीण झालंय. मुंबईतील अंधेरी पश्चिमेत ३ बीएचके घरासाठी एक मुलगी तब्बल १ लाख २० हजार रुपये भाडं देतेय. हे भाडं भरण्यासाठी तिने भरपूर स्ट्रगल केलाय असंही ती म्हणाली आहेत.
व्लॉगर आर्य कोठारीने त्याच्या Rent in Mumbai EP 4 या त्याच्या इन्स्टाग्राम सीरिजसाठी एका तरुणीची मुलाखत घेतली. ही तरुणी अंधेरी पश्चिम भागात राहते. या व्हिडिओमध्ये आर्य कोठारीने तिने या घराच्या भाड्याबाबत विचारले. या घराच्या भाड्यापोटी ती १ लाख २० हजार रुपये भरत असल्याचं तिने सांगितलं.
परफेक्ट गर्ल बेडरुम
तिने या ३ बीएचके खोलीची टूरही घडवली. अत्यंत स्वच्छ, प्रशस्त हॉल, स्वयंपाक घर असलेल्या या घराला ओपन गॅलरीही आहे. तर, तिच्या स्वतःच्या बेडरुममध्ये परफेक्ट गर्ल बेडरुमचा लूक असं इंटेरिअर केलं आहे. तिच्या बेडशीटपासून उशांपर्यंत सर्वकाही गुलाबी रंगाचं असून बेडच्यावर गुलाबी रंगाचा बो देखील आहे.
मी खूप स्ट्रगल केलाय
धक्कादायक म्हणजे या घराचं भाडं भरण्याकरता एखादा व्यक्ती मोठा व्यावसायिक तरी हवा किंवा चांगला पगारदार तरी हवा. पण संबंधित तरुणी म्हणते की मी स्टे अॅट होम डॉटर आहे. मी खूप स्ट्रगल केलाय. या घरात राहण्याकरता मी माझ्या काकांकडे खूप याचना केली आहे. मी माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलंय, त्यामुळे मला त्याबदल्यात पैसे मिळतात.
मी माझ्या आईची आई झाले
“मी लहानपणापासून माझ्या आईची आई झाले आहे. तिला स्क्रिझोफेनिया आहे. तिला थंडी सहन होत नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसांत मी आईला घेऊन येथे राहते, कारण येथे बऱ्यापैकी गरम वातावरण असतं. तसंच, मुंबईत एवढं भाड्याचं घर घेऊन राहण्याकरता कमीत कमी अडीच लाखांचं दरमहा उत्पन्न हवं”, असंही ती म्हणते.
दरम्यान, हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरला असून इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी म्हटलंय की मुंबईत राहणं खरंच कठीण झालं असून संपूर्ण पगार हा फक्त घराचं भाडं देण्यातच जातंय.
