Mumbai Crime : मुंबईमधील अँटॉप हिल परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एका तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून घेत आयुष्य संपवल्याचं समोर आलं होतं. ही तरुणी मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात दंत चिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. मात्र, तिने अचानक अशा पद्धतीने स्वत:चं जीवन संपवल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी आढळून आलेल्या सुसाईडमधील उल्लेखामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळण्याची शक्यता आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख करत ‘तू देखील फ्रिजमध्ये सापडशील’, असा उल्लेख या विद्यार्थिनीच्या सुसाईडनोटमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केलं आहे. ही घटना नेमकं कशामुळे घडली? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेबाबत आज पोलिसांनी नेमकं काय घडलं? याबाबत महत्वाची माहिती सांगितली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेबाबत झोन चारच्या डीसीपींनी सांगितलं की, “९ तारखेला सकाळी ११ वाजता एका २४ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार अँटॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपशील गोळा केला. तेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या तपासादरम्यान काही सुसाईड नोट्स आढळून आल्या आहेत. त्या नोट्समध्ये नमूद करण्यात आलेल्या उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर त्याच रात्री तिच्या एका मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी मोहम्मद याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुसाईड नोट्समधील मजकुराच्या आधारे पोलीस आता पुढील तपास करत आहेत.”

पोलिसांना मिळाली सहा पानांची सुसाईड नोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतल्या एका डेंटल मेडिकल कॉलेजमध्ये ही मुलगी MDS चं शिक्षण घेत होती. या मुलीने ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सहा पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या सहा पानी सुसाईड नोटमध्ये या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप केले. बॉयफ्रेंड फजल मोहम्मद खान आपला छळ करायचा आणि चारित्र्यावर संशय घेत असायचा असं तिने म्हटलं.

पोलिसांनी आरोपीला केलं अटक

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मोहम्मद फजल अहमद खान या ३१ वर्षांच्या तरुणाला अटक केली. आरोपी आणि संबंधित तरुणी यांचे एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आरोपी हा तिला कायम त्रास देत होता आणि तिच्यावर संशय घेत होता, या प्रकरणात आता चौकशी सरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.