मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर बाजार समितीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार उपनिबंधक राजाराम धोंडकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सहकार विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजाराला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या बाजारासाठी बाजार समितीची रचना आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही अधिनियमात तरतुदी करण्यात आल्या आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पद सध्या पद रिक्त असल्याने हे पद भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उपनिबंधक राजाराम धोंडकर यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. धोंडकर यांनी तातडीने पदभार स्वीकारून त्या बाबतचा अहवाल शासनाला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.
दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सचिवपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज, बाजार व्यवस्थापन आणि शासनाच्या संबंधित धोरणांची अंमलबजावणी यासाठी सचिवपद महत्त्वाचे मानले जाते.
