शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार प्रकाश सुर्वे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाच्यावतीने ही नियुक्ती करण्यात आली असून शिवसेनेच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून तसे परिपत्रक काढण्यात आले आहे.

राज्यातील सत्तांतरांतर शिंदे गटाने शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिंदे गटाने आता सर्वत्र शिवसेनेप्रमाणे विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या समांतर नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची मुंबई विभाग क्रमांक १ च्या विभागप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. या विभागात शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार विलास पोतनीस हे विभाग प्रमुख आहेत. त्यांना शह देण्यासाठी सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एक वर्षासाठी नियुक्ती –

दरम्यान, सुर्वे यांना दिलेल्या पत्रात नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल असे लिहिले आहे. शिवसेनेतील विविध नियुक्त्या सेना भवन येथील मध्यवर्ती कार्यालयातून होत असतात. तशाच पद्धतीने मध्यवर्ती कार्यालयाच्या पत्रावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. या पत्रावर कार्यालयाचा पत्ता हा ठाणे टेंभी नाका येथील आनंद आश्रमाचा आहे. तसेच पत्राखाली एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी असून मुख्यनेता शिवसेना असे लिहिले आहे.