मुंबई : प्राच्यविद्या संशोधनामध्ये दोन दशके कार्यरत असलेल्या मुंबईच्या ‘दि एशियाटिक सोसायटी’ची दोन वेळा रद्द झालेली निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. ४ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत संस्था कार्यालयात मतदान होणार असून आहे. यावेळच्या मतदानाला २५३० सभासद पात्र ठरले आहेत.
१९ जागांसाठी तीन गटाचे ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे ‘सेव्ह एशियाटीक’ गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ‘एशियाटिक टुमारो’ गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. केतकर गटाने १३, सहस्त्रबुद्धे गटाने १९ आणि निवडणुकीतील तिसरा गट असलेल्या आर. व्यंकटेश गटाने ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
मावळत्या अध्यक्षा प्रा. विस्पी बालापोरिया यांनी तीन वर्षे संस्थेचा कारभार पाहिला. मार्च २०२५ मध्ये झालेल्या छाननीमध्ये ३६३८ सभासद पात्र ठरले होते. निवडणुकांना काही महिने राहिले असल्याने दोन्ही गटांनी आपल्या पाठीराख्यांना सभासद करत संख्या वाढवली होती. त्यामध्ये १४३० नव्या सभासदांची भर पडली होती. यावरुन केतकर आणि सहस्त्रबुद्धे गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.
यासंदर्भातला वाद धर्मादाय आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने दोन वेळा निवडणूक स्थगित करण्यात आली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने संस्थेचे विद्यमान पाच सदस्य आणि धर्मादाय आयुक्त यांचा प्रतिनिधी यांची उपसमिती नेमली आणि दोन महिन्यांमध्ये पात्र सभासद निश्चित करावेत आणि निवडणूक घ्यावी असे २३ एप्रिल रोजी आदेश दिले होते.
त्यानुसार २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत सभासद प्रक्रिया पूर्ण केलेल्या सभासदांना मतदानस पात्र ठरवण्यात आले आहे. मतदान याद्यांवर ५८ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी घेत त्या निकाली काढण्यात आल्या. पात्र सभासदांच्या याद्या संस्थेच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. ज्ञानोपासक संस्था असलेल्या ‘एशियाटिक’च्या यावेळच्या निवडणुकीला पक्षीय रंग आल्याने मोठी टीका झाली होती. मतदानास येताना सभासदांनी सोबत संस्थेने दिलेले ओळखपत्र आणावे, असे निवडणूक उपसमितीने आवाहन केले आहे.
उजवे विरुद्ध इतर :
मागच्या एशियटीकच्या निवडणुकीला केवळ 180 सभासदांनी मतदान केले होते. या निवडणुकीला राजकीय रंग आल्याने मतदान वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक उजवे विरुद्ध इतर अशी होत आहे. मागच्या वर्षी झालेल्या गिरगाव साहित्य संघाच्या निवडणुकीत उजव्या गटाचा पॅनल पराभूत झाला होता. एशियाटिकच्या निवडणुकीत काय होणार याविषयी उत्सुकता आहे.
