मुंबई : Auto Rickshaw Taxi Fare Hike Mumbai पेट्रोल, डिझेल, सीएनजी, साखर व इतर विविध अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने, सर्वसामान्य नागरिक महागाईने दबला आहे. तर, आता पुन्हा रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ झाल्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. १ सप्टेंबर रोजीपासून रिक्षाचे एक रुपयाने आणि टॅक्सीची दोन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढलेल्या परिचालन खर्चाचा विचार करून बेस भाड्यात वाढ मंजूर केली आहे. नवीन दरानुसार ऑटो-रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. हे दोन्ही दर पहिल्या १.५ किलोमीटर अंतरासाठी लागू असतील. प्रवाशांकडून ऍप आधारित वाहने आरक्षित केली जात असल्याने, टॅक्सी व्यवसाय धोक्यात आला आहे.

त्यामुळे मुंबईमधील टॅक्सीच्या संख्येत घट होत आहे. तसेच रिक्षा-टॅक्सी यांची देखभाल-दुरूस्तीचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला आहे. यासह इंधन खर्च, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती.

अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरटीए बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) अधिसूचना जारी झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजीपासून नवीन भाडेदर लागू होणार आहे.

संघटनांची मागणी मान्य

ऑटो-टॅक्सी संघटना अनेक महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी करत होत्या. मे महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीचा दर ८६ रुपये प्रति किलो केल्यानंतर मुंबई रिक्षामेन्स युनियनने प्रति किलोमीटर १.१२ रुपयांची वाढ मागितली होती.

खटुआ समितीच्या शिफारशींवर निर्णय

ही भाडेवाढ २०१७ च्या बी. सी. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आली आहे. समिती इंधनाचे दर, वाहनांचा खर्च, कर्जावरील व्याजदर, ग्राहक किंमत निर्देशांक आणि सरकारी कर या निकषांच्या आधारे भाडेदर निश्चित करण्याची शिफारस करते. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये ऑटो आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अनुक्रमे ३ आणि ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२१ मध्येही भाडेवाढ लागू करण्यात आली होती.

चालकांची धावपळ

नव्या दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक असताना, मुंबई शहरातील टॅक्सी आणि दोन्ही उपनगरांतील रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे. रिकॅलिब्रेशन लवकरात लवकर करण्यासाठी रिक्षा, टॅक्सी चालकांची धावपळ सुरू आहे.