मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सीच्या सुधारित भाडेदराची अंमलबजावणी होऊन अनेक दिवस उलटले, तरी डिजिटल मीटरमध्ये नवीन दर अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेली विद्युत चिप अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हजारो चालकांना मीटर रिकॅलिब्रेशनसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

परिवहन विभागाने मीटर उत्पादक कंपन्या आणि चिप पुरवठादारांसोबत बैठक घेऊन नवीन भाडेदरानुसार चिपचे उत्पादन व प्रोग्रामिंग सुरू केले आहे. मात्र पुरेशा प्रमाणात चिप उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने प्रत्यक्ष रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

अशी असेल प्रक्रिया

मीटर रिकॅलिब्रेशनसाठी चालकांना प्रथम अधिकृत मीटर उत्पादक किंवा अधिकृत केंद्रात नवीन चिप बसवावी लागेल. त्यानंतर वाहनाची रस्त्यावर प्रत्यक्ष चाचणी (कॅलिब्रेशन) घेतली जाईल आणि अखेरीस आरटीओकडून मीटर सील करून पासिंग प्रमाणपत्र दिले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच डिजिटल मीटरवर नवीन भाडेदर दिसू लागेल. दरम्यान, रिकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत चालकांना आरटीओने मंजूर केलेल्या अधिकृत भाडेतक्त्यानुसार सुधारित भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

सर्व रिक्षा व टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या ९० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुदत संपल्यानंतर रिकॅलिब्रेशन न केलेल्या वाहनांवर प्रतिदिन दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे.

मीटर रिकॅलिब्रेशनचा खर्च

परिवहन विभागाने चालकांकडून अवाजवी वसुली होऊ नये, म्हणून एकूण शुल्क ७०० रुपये निश्चित केले आहे.

मीटर चिप (जीएसटीसह) –

२८० रुपये

मीटर दुरुस्ती – २७५ रुपये

मीटर चाचणी (जीएसटीसह) – १२० रुपये सील – २५ रुपये

एकूण – ७०० रुपये

आरटीओचे कडक नियम

रिकॅलिब्रेशन केंद्रांवर शासनाने निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावणे, संगणकीकृत पावती देणे, सीलचा क्रमांक नमूद करणे आणि सीसी टीव्ही कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी वाहनांच्या नोंदणी क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. वसई आणि मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रातील वाहनांना ठाणे आरटीओअंतर्गत केंद्रांवर रिकॅलिब्रेशन करण्याची विशेष सवलत देण्यात आली असून, इतर चालकांनी संबंधित आरटीओ कार्यक्षेत्रातील अधिकृत केंद्रांवरूनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.