मुंबई : “कुठे जायचे आहे?”,“रिक्षा रिकामी आहे, कोणत्या मार्गाने जाऊ या, भाडे रोख रक्कमेत द्या? अशा मराठी वाक्यांची सध्या रिक्षा-टॅक्सी चालक उजळणी करीत आहेत. राज्य सरकारने मराठी बंधनकारक केल्यानंतर मुंबई महानगरात दीड लाख रिक्शा-टॅक्सी चालकांनी राज्याचा ४ तासांचा मराठी अभ्यासक्रम पूर्ण केला. आजही अनेक चालकांची मराठी शिकवणी शिल्लक आहे. मराठी न बोलणाऱ्या लाखो चालकांवर १८ ऑगस्टपासून परवाने तीन महिन्यासाठी निलंबित होण्याच्या कारवाईची टांगती तलवार मात्र कायम आहे. मराठी शिकण्यात ७ हजार ७५० चालक नापास झाले आहेत.

एप्रिल महिन्यांपासून मूलभूत मराठी संवाद शिकण्याची मोहीम परिवहन विभागाने विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये राबवली होती. ११४ प्रशिक्षण केंद्रांमधून सुमारे दोन हजार भाषा प्रशिक्षकांनी सव्वा लाखापेक्षा अधिक चालकांना मूलभूत मराठी संवादाचे प्रशिक्षण दिले, मात्र अद्याप लाखो चालकांचे प्रशिक्षण बाकी असल्याचे सांगण्यात आले. या चालकांचे परवाने १८ ऑगस्टपासून तीन महिन्यांकरता निलंबित होण्याच्या कारवाईची टांगती तलवार अद्यापही त्यांच्यावर कायम आहे.

परिवहन विभागाच्या ११४ प्रशिक्षण केंद्रांमध्ये असे प्रशिक्षण सुरू झाले असले तरी चालकांची प्रवाशांशी असणारी अरेरावी, उर्मटबाजी आणि भाडे दाखवण्यासंदर्भातील तक्रारी मात्र कमी होण्याची शक्यता नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर मराठी संभाषणामुळे चालक प्रवाशांशी सुसंवाद सहज करू शकत असल्याने भाडे नाकारणे किंवा अरेरावीने वागण्याच्या घटनांमध्ये घट होईल आणि चालक अधिक आत्मविश्वासाने आपले काम करू शकतील, अशी आशा आणि विश्वास परिवहन विभागाला आहे.

मुंबई महानगरात जवळजवळ दीड लाख रिक्षा- टॅक्सी चालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले. आजही अनेक चालक मराठीचे शिक्षण घेत आहेत. मराठी न येणाऱ्या चालकांवर १५ ऑगस्टपासून कारवाई सुरु आहे. – रवी गायकवाड, अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि अध्यक्ष,मराठी समिती.

कारवाई काय ?

१८ ऑगस्टपासून ज्या रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नाही. त्यांचे वाहन परवाने तीन महिन्यांपर्यंत निलंबित केले जाऊ शकतात. तर वारंवार उल्लंघन केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुंबईच्या वाहतूक कोडींतून मार्ग काढण्यापेक्षा मराठी शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.

शाळा पुन्हा सुरू

“आम्ही पिढ्यानपिढ्या मुंबईत राहत आहोत. त्यामुळे आम्हाला मराठी भाषा येते आणि आम्ही घरीसुद्धा मराठी बोलतो. मात्र, अनेकदा जेव्हा कोणी टॅक्सीत बसते, विशेषतः मराठी भाषिक प्रवासी, तेव्हा ते आमच्याशी हिंदीत बोलतात. आम्ही मराठीत बोलायला तयार आहोत, त्यामुळे त्यांनीही आमच्याशी मराठीतच बोलायला हवे. – राजेश जयस्वाल, टॅक्सीचालक, (मुळचे काशीमधील रहिवासी)

मराठीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा गाडी चालवण्यासाठी घालवलेल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. १९८५पासून मुंबईत वास्तव्यास आहे. मला मराठी भाषा समजते. पण फार बोलता येत नाही. दोन तास थांबलो, पण नापास झालो. पुन्हा प्रयत्न करणार. शेवटी परीक्षा अनिवार्य आहे. – रामाशंकर मिश्रा, रिक्षाचालक (मुळचे जौनपूरमधील रहिवासी)

इतक्या वर्षांत आम्हाला मराठी येण्याची कधीच गरज भासली नाही. प्रवासी सुद्धा सहसा हिंदी बोलतात. पण जर हाच नियम असेल, तर आम्हाला शिकावे लागेल. शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे. – रामचंद्र यादव, रिक्षाचालक (मुळचे बिहारमधील रहिवासी)

माझी पत्नी महाराष्ट्रातील असल्याने मी मराठीतून व्यवस्थित संवाद साधू शकतो. पण मला ही परीक्षा द्यायचीच होती. जेणेकरून मी पकडला गेलो, तर चालकाला स्थानिक भाषा चांगली अवगत आहे हे मी दाखवू शकेन. – मुस्तकिम अन्सारी, रिक्षाचालक (मुळचे झारखंडचे रहिवासी)