मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील काळ्या-पिवळया टॅक्सी, रिक्षा उभ्या करण्यासाठी थांब्याची संख्या खूपच अपुरी असल्याने चालकांची गैरसोय होत आहे. तसेच प्रवाशांनाही टॅक्सी – रिक्षासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता रुंदीकरण अथवा मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी रिक्षा-टॅक्सी थांबे हटवण्यात आले होते. परंतु हे थांबे पुन्हा सुरू झालेले नाहीत. शहरातील रिक्षा- टॅक्सीची संख्या पाहता थांबे पूर्ववत करून त्यांची संख्या वाढविण्याची मागणी संघटना, चालक आणि प्रवाशांकडून होत आहे.

शहरात सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी टॅक्सीकरिता सुमारे दोन हजार, तर रिक्षासाठी जवळजवळ १८०० थांबे होते. त्यावेळी रिक्षा-टॅक्सीची संख्या कमी असल्याने उपलब्ध थांबे चालकांसाठी पुरेसे होते. कालांतराने रिक्षा – टॅक्सीची संख्या वाढली. दरम्यान, अस्तित्वात असलेल्या थांब्याची संख्या कमी होत गेली. सध्या मुंबईमध्ये सुमारे १८ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी, तर नोंदणीकृत रिक्षाची संख्या जवळपास २ लाख ६० हजार आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या टॅक्सी-रिक्षांसाठी पुरेसे थांबे नाहीत.

अस्तित्वातील थांब्यापैकी काही थांबे रस्ता रुंदीकरण अथवा मेट्रोच्या कामासाठी हटवण्यात आले. काही ठिकाणच्या थांब्यांचे गर्दुल्ल्यानी नुकसान केले आहे. थांबे नसल्याने चालकांची परवड होत आहे. पूर्वी थांबा असलेल्या ठिकाणी वाहने उभी केली तर वाहतूक पोलिस कारवाई करतात. दुपारी विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यासही वाहतूक पोलिस दंड आकारतात. शहरात उरलेल्या टॅक्सी थांब्यांची जागा खाजगी वाहनांनी व्यापलेली असते. टॅक्सीच्या जागेवर खाजगी वाहने उभी केली जातात. भाटिया रुग्णालय, ताडदेव गंगा-जमुना, हाजी अली, ग्रॅन्ट रोड स्थानकाबाहेर अनेक टॅक्सी थांब्यावर शेअर टॅक्सीवाले आणि खाजगी मोटारगाडीचालकांनी कब्जा केला आहे.

रिक्षा चालकांचीही तशीच अवस्था आहे. शहरातील ९० टक्के रिक्षा थांबे हटवण्यात आले आहेत. जर चालक अशा ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी उभे राहिले तर वाहतूक पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. पहिल्यांदा वाहतूक नियमांचे उल्लंधन केल्याबद्दल ५०० रुपये, तर दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दीड हजार रुपये दंड आकारण्यात येतो. परिवहन प्राधिकरण आणि पालिकेद्वारे नवीन टॅक्सी-रिक्षा थांबे बनवण्याची योजना होती. २८ मेट्रो स्थानकांबाहेर काही नवीन शेअर रिक्षा- टॅक्सी थांबे बनवण्यात येणार होते. मात्र ही योजना अद्याप कागदावरच आहे.

अपुरे थांबे

अंधेरी परिवहन विभागात २७६, बोरिवली विभागात २७९, वडाळा विभागात १६९ असे सुमारे ७२४ रिक्षा थांबे आहेत. या थांब्यावर २ हजार ७८६ रिक्षा उभ्या राहू शकतात. तर रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षाची संख्या सुमारे तीन लाखांच्या घरात आहे

सरकारने एक समिती स्थापन करावी. समितीमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिस आणि महापालिकेचा एक वरिष्ठ अधिकारी असावा. शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांच्या संख्येच्या आधारे सर्वेक्षण करून एक अहवाल तयार करावा. त्याआधारे आवश्यक रिक्षा थांबे उभारावेत. – तंबी कुरियन, महासचिव, मुंबई रिक्षा मेन्स युनियन