मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता मुंबईतील बेकरी व्यवसायावर होऊ लागला आहे. मुंबईतील शेकडो बेकऱ्यांना गॅसटंचाईची झळ सोसावी लागत असून त्यांचे व्यवसाय संकटात आले आहेत. गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक बेकरीचालकांनी व्यवसाय बंद केले आहेत. विजेवरील भट्ट्यांचा खर्च अफाट असल्याने तोही पर्याय अवलंबिण्यास व्यावसायिक तयार नसल्याचे समजते. विजेच्या वाढत्या दरामुळे उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे बेकरीचालकांचे म्हणणे आहे. शासनाने ठोस उपाययोजना न केल्यास येत्या काळात मुंबईकरांना पाव, ब्रेड, टोस्ट, खारी महागण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी लाकूड व कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्यांना पर्यावरणस्नेही इंधन वापरण्याच्या सूचना केल्या होत्या. पालिकेच्या सूचनेचे पालन न करणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतर बेकऱ्यांनी एलपीजी गॅसचा वापर सुरु केला. मात्र, आखती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम इंधनपुरवठ्यावर झाला असून नागरिकांना गॅस सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय संकटात आले असून त्याचा फटका मुंबईतील बेकऱ्यांनाही बसू लागला आहे.
गॅस उपलब्ध होत नसल्याने ३० टक्के बेकऱ्या बंद झाल्या आहेत. अनेक बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईत सद्यस्थितीत सुरु असलेल्या बेकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा असून त्यांचेही व्यवसाय बंद होण्याचा मार्गावर आहेत. रम्यान, गॅसच्या तुटवड्यामुळे बंद झालेल्या बेकरीचालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच, बेकरीतील कामगारांच्या हातचे काम गेल्याने त्यांनाही उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
बेकरी चालकांचा आंदोलनाचा इशारा
बेकरीचालकांच्या या समस्येबाबत द बॉम्बे असोसिएशनने नुकतीच विशेष बैठक आयोजित केली होती. त्यात बेकरीचालकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आल्या. गॅस उपलब्ध होत नसल्यास बेकरी चालकांसमोर विजेचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, संपूर्ण भट्टी विजेवर चालवण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, यावर व्यावसायिकांचे एकमत झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात शासनाने पुन्हा कोळसा व लाकडावर बेकारी चालवल्यास परवानगी द्यावी. तसेच, हॉटेल व्यावसायिकांना २० टक्के एलपीजी दिला जात आहे. त्याच पद्धतीने बेकरीचालकांसाठीही गॅसपुरवठा करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी द बॉम्बे बेकर्स असोसिएशनने केली आहे. शासनाने बेकरी चालकांसाठी गॅस पुरवठा करण्यास सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बेकरी चालकांच्या बैठकीत घेण्यात आला, असा इशारा द बॉम्बे बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नासिर अन्सारी यांनी दिला.
