मुंबई : वांद्रे येथील एम. मे चेंबूर मार्गावरील सात मजली इमारतीला शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अचानक आग लागली. आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे सातजण गुदमरले. या सात जणांना तातडीने रुग्णालयात दाख ल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एम. मे चेंबूर मार्गावरील सात मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. आगीचा भडका उडाल्याने इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते.
या आगीत गजला शेख (४७), जावेद शेख(४८), तहेरा शेख (२८), मोहिमुद्दिन शेख (८), इस्माईल शेख (३८), मरीहा शेख (१२), मेहनूर शेख (२०) हे सात जण गुदमरले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढले. तसेच उपचारासाठी त्यांना नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
