मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील ताज लँडस् एण्ड हॉटेलातील कामगार युनियन ताब्यात घेण्यावरून शिवसेना(ठाकरे)- भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनाप्रणीत (ठाकरे) भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघटनेत सहभागी होण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून येत असलेल्या दबावाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हॉटेलवर निदर्शने केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

वांद्रे येथील पंचतारांकित ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये आधीपासून अधिकृत मान्यता असलेली शिवसेनेची भारतीय कामगार सेना कार्यरत आहे. त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचीही स्थापना करण्यात आली . भाजपच्या या संघटनेमध्ये ठाकरे गटाच्या कामगारांची दिशाभूल करून, त्यांच्या सह्या घेऊन संघटनेत सहभागी होण्याबाबत हॉटेल प्रशासनाकडून दबाव येत होता. त्याविरोधात शुक्रवारी शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात शिवसेनेने ताज लँड्सबाहेर आंदोलन केले. ताज लँड हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी स्वतः अनिल परब त्या ठिकाणी आले असता पोलिसांनी त्यांना अटकाव केला. पोलिसांनी हॉटेलचे मुख्य द्वार बंद केले. त्यावेळी परब यांनी पोलिसांना धारेवर धरले.

भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या फसवून सह्या घेण्यात आल्याचा आरोप परब यांनी केला. दरम्यान, भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचाारी संघटनेत घेतले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. फसवून कामगारांच्या सह्या घेतल्या जात असून चुकीच्या पद्धतीने भाजप युनियन घुसवू पाहत असल्याचा आरोप करण्यात आला. मोठ्या संख्येने शिवसैनिक हॉटेलबाहेर जमल्याने तणाव निर्माण झाला होता.