मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या कामादरम्यान वांद्रे पूर्व येथे सोमवारी रात्री १०.५२ वाजता बांधकामस्थळी आग लागली. ही आग प्रचंड मोठी होती. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आपत्कालीन प्रतिसाद पथकाने आणि मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेत आग नियंत्रणात आणण्यास यश मिळवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी यात झाली नाही. मात्र यातून मेट्रोच्या कामादरम्यान कंत्राटदार मेसर्स जे. कुमार कंपनीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, एमएमआरडीएने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

एमएमआरडीएकडून ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेचा विस्तार अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द दरम्यान करण्यात येत आहे. या मार्गिकेचे टप्प्याटप्प्याने काम सुरू असून यातील मंडाले – डायमंड गार्डन टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. टप्पा २ आणि टप्पा ३ चे काम सध्या सुरू आहे. टप्पा २ चे काम सुरू असताना सोमवारी रात्री १०.५२ मिनिटांच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील पी-४०० (डावीकडील बाजूस), पायलॉन-४ येथे आग लागली.

आग श्रेणी ४ ची होती. मात्र एमएमआरडीएच्या आपत्कालीन प्रतिसाद विभागाने आणि पालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही मोठी दुर्घटना वा जीवितहानी झाली नसल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. तसेच मेट्रोच्या संरचनेचेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचाही दावा केला आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट नसून कारण शोधण्यासाठी एमएमआरडीएकडून चौकशी करण्यात येत असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

आग झालेल्या टप्प्याचे काम मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीकडे आहे. या कंपनीकडून मेट्रो वा इतर प्रकल्पांच्या कामादरम्यान सातत्याने अपघात, दुर्घटना होत आहेत. ‘दहिसर – मिरा – भाईंदर मेट्रो ९’च्या कामादरम्यान या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात सात जणांचा जीव गेला. तर इतर प्रकल्पांतही मोठे अपघात झाले. मात्र या कंपनीविरोधात केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. आता सोमवारी या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मेट्रो २ ब च्या कामादरम्यान आग लागल्याची घटना घडली. याप्रकरणी तरी एमएमआरडीएकडून कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई केली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.