सहकारी बँकांच्या निवडणुकांचे माहोल राज्यभर रंगात आलेले असताना, या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबै बँकेच्या निवडणुकीत मात्र भाजपने सर्वपक्षीय उमेदवारांच्या सहकार पॅनेलला साथ दिली असून शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या विरोधात अधिकृतपणे दंड थोपटले आहेत. शिवसेनेने निवडणुकीत उतरविलेल्या उमेदवारांच्या गुन्ह्य़ांचा हिशेब मांडला तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेच्या पॅनेलला आव्हान दिले आहे.
भाजपने पुरस्कृत केलेल्या पॅनेलमध्ये सहकार आहे, तर त्यांच्या पॅनेलमध्ये अहंकार आहे. अहंकाराला पाठिंबा द्याल तर एकाधिकारशाही येईल आणि सहकाराला पाठिंबा द्याल तर बँकेचा उत्कर्ष होईल, असा दावा करतानाच, सहकार पॅनेलमधील उमेदवारांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोपही आमदार शेलार यांनी फेटाळून लावले. जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कुणीही गुन्हेगार नसतो, असे सांगत त्यांनी सहकार पॅनेलमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवारांची पाठराखण केली. सहकार पॅनेलमध्ये जे जे चांगले आहेत, त्यांनी एकत्र येऊन बँकेचा उत्कर्ष साधावा या भावनेतून भाजपने या पॅनेलला संपूर्ण पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी जाहीर केले. माझा पक्ष आणि सरकारही, या पॅनेलचे गॅरेंटर आहेत, असे स्पष्ट केले.
मुंबई बँकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दादर येथे सहकार पॅनेलने आयोजित केलेल्या सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार शेलार यांच्यासह अन्य उमेदवारांचीही भाषणे झाली.