मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या मजूर प्रवर्गातील एका रिक्त जागेसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीतील मतदार यादीच बोगस असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी तक्रार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबै बँकेतील मजूर प्रवर्गातील संचालक निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाने जाहीर केला आहे. या निवडणुकीत विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. मात्र प्रवीण दरेकर यांना मुंबई विभागीय सहनिबंधकांनी मजूर सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून अपात्र ठरविलेले असले तरी प्रवीण दरेकर यांचे नाव मतदार यादीत आहे. तसेच अनेक मजूर संस्थांची चौकशी सुरू आहे तर काही मजूर संस्था बोगस आहेत. त्यामुळे मतदार यादी सदोष असून ती दुरुस्त करण्यात यावी. तोपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीचा आधार घेत केली आहे. प्रकाश दरेकर हे मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष असून माजी नगरसेवक असल्यामुळे ते मजूर होऊ शकत नाही, असेही या तक्रारीत म्हटले आहे.