मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं सरशी साधली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे आता मुंबै बँकेवरील भाजपाचं वर्चस्व कमी झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थात पर्यायाने महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखाली ही बँक आली आहे. भाजपाचे प्रसाद लाड यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत झाल्याने बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीनं या निवडणुकीत मात्र बाजी मारून कसर भरून काढल्याचं बोललं जात आहे.

या निवडणुकीत युती करण्यासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. यावेळी बँकेतील प्रतिनिधी देखील होते. या बैठकीमध्ये युतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित मिळून ११ जागा झाल्या, तर भाजपाकडे अवघ्या ९ जागा शिल्लक राहिल्या. त्यामुळे अवघ्या दोन मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव झाला.