मुंबई : एका अभिनेत्रीची संपादीत केलेली, तसेच मोबाइल हॅक करून चोरलेली अश्लील छायाचित्रे टेलिग्रॅमच्या खासगी ग्रुपवर प्रसारित केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अभिनेत्री विविध मालिका आणि सिनेमात काम करते. ती आपल्या आईसह मालाड येथे राहते.
टेलिग्राम या समाजमाध्यमाच्या समूहावर तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित झाल्याची माहिती तिला तिच्या व्यवस्थापकाने दिली. टेलिग्रामचा ‘न्यू सायकल ऑन रोड ००’ नावाचा समूह आहे. त्यात पैसे भरून सदस्य होता येते. या समूहात ही संपादीत (एडीट) केलेली अश्लील छायाचित्रे पोस्ट करण्यात आली होती. हा समूहात वापरकर्त्याची ओळख उघड होत नाही. मिस्टर रॉकी आरके या नावाच्या वापरकर्त्याने ही छायाचित्रे टाकली होती. त्यानंतर अभिनेत्रीने एका व्यक्तीला या समूहात पैसे भरून सामील करून घेतले. त्यानंतर तिला आणखी धक्का बसला.
या समूहात १७ एप्रिल २०२५ ते १९ मे २०२५ या कालावाधीत या अभिनेत्रीची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित झाल्या होत्या. ही छायाचित्रे माझा मोबाइल हॅक करून चोरून अपलोड करण्यात आल्याची तक्रार अभिनेत्रीने केली आहे. अभिनेत्रीच्या नावाने प्रीमियम व्हर्जन असे नमूद करून ही छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या आहेत.
अभिनेत्री आणि तिच्या व्यवस्थापकाने संबंधित वापरकर्त्याशी संपर्क साधून छायाचित्रे हटविण्याची विनंती केली होती. मात्र ती हटविण्यात आली नाहीत. त्यामुळे अखेर या अभिनेत्रीने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी या तक्रारीवरून टेलिग्राममधील वापरकर्त्याविरोधात भारतीय न्यायंसहितेच्या कलम ७४, ७८, ३५६ ९२), ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.