मुंबई : मुंबईतील सहा समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांची सेवा पुरवण्याचे कंत्राट संपून एक वर्ष झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने आता नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना याबाबतचा प्रस्ताव अग्निशमन दलाने स्थायी समितीसमोर आणला आहे. दरम्यान, नवीन कंत्राटात जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, आक्सा व गोराई या सहा समुद्र किनाऱ्यांवर बाह्य संस्थेची नेमणूक करून जीवरक्षकांची सेवा पुरवली जाते. मात्र त्यापूर्वी २०२२ मध्ये ज्या कंत्राटदाराला तीन वर्षांचे कंत्राट दिले होते, त्याचे कंत्राट मे २०२५ मध्ये संपले. नव्याने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया प्रशासनाने आता सुरू केली असून अद्याप कंत्राटदार नेमलेला नाही. त्यामुळे नवीन कंत्राटदार येईपर्यंत जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव अग्निशमन दलाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणला होता.

समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक नेमण्याचे कंत्राट जून २०२५ मध्ये संपले होते, तर नवीन प्रस्ताव आणण्यास एक वर्षाचा विलंब का झाला ? तसेच या विलंबासाठी अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येणार, असा प्रश्न यावेळी झालेल्या चर्चेत भाजप नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी उपस्थित केला. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी जीवरक्षकांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. अनेकदा जीवरक्षक फक्त गप्पा मारताना दिसतात. बुडणाऱ्यांना वाचवण्याचे काम स्थानिक कोळी बांधवच करतात असेही ते म्हणाले.

पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटक आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नव्या कंत्राटात जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. यावर्षी विविध चौपाट्या आणि समुद्र किनाऱ्यांवर १३७ जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी केवळ ९३ जीवरक्षक होते. प्रत्येक जीवरक्षक ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या समुद्र किनारी भागावर लक्ष ठेवणार आहेत. पावसाळ्यात चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक येत असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

कंत्राटात दीड कोटींची वाढ

जुन्या कंत्राटदाराला ६ कोटी ७ लाखांचे कंत्राट देण्यात आले होते. त्याला मुदतवाढ दिल्यामुळे दहा महिन्यांसाठी १ कोटी ५७ लाख रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत.

मुंबईत एकूण १२ समुद्र किनारे…

मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण १२ समुद्र किनारे आहेत. त्यापैकी टाटा गार्डन समुद्र किनारा हा खासगी असून राजभवन समुद्र किनाऱ्यावर जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आहे. तसेच वाळकेश्वर, वरळी, माहीम, वांद्रे ते खार, मनोरी, मार्वे येथील समुद्र किनारे असुरक्षित खडकाळ व सांडपाणी सोडण्यात आले असल्यामुळे तेथे पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. उर्वरित समुद्र किनारे म्हणजेच गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, आक्सा व गोराई या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक जातात.