मुंबई : परिवहन विभागाने बेकायदेशीर अॅप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अनधिकृत बाइक टॅक्सीला चाप बसणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाइक टॅक्सी धावत असल्याचे नुकतेच उघड केले होते.

मुंबईतील रस्त्यांवर अनधिकृतपणे बाइक टॅक्सी धावत असून प्रवाशांचा असुरक्षित प्रवास होत असल्याचे उघडकीस आले होते. नुकतेच मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो ॲपवर स्वतः अनोळखी नावाने बाइक टॅक्सी आरक्षित केली. पुढच्या दहा मिनिटांमध्ये बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकात आली. त्यानंतर, अनाधिकृतरित्या बाईक टॅक्सी ॲप चालवणाऱ्या संस्था कार्यरत असल्याचे स्वतः परिवहन मंत्र्यांनी उघडकीस आणले. मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही, असे परिवहन विभागाकडून मिळणारे उत्तर खोटे ठरले.

परवाना न घेता सेवा

बाईक टॅक्सी नियमावलीला राज्य सरकारने मंजुरी दिलेली नसतानाही अॅप आधारित वाहतूक सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यांची बाईक टॅक्सी सेवा मुंबईत सुरू केली. त्यामुळे आता रॅपिडो, उबेर व ओला या अॅप्सच्या माध्यमातून महानगर क्षेत्रात बेकायदेशीर व परवाना न घेता प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवासी वाहतूक ही मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ९३ व मोटार वाहन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२० यांच्या अधीन राहून परवाना घेणे आवश्यक असतानाही संबंधित कंपन्यांकडून कोणतीही वैध परवानगी न घेता अॅपच्या माध्यमातून बाइक टॅक्सी सेवा दिली जात आहे.

खासगी वाहनाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी नाही

मोटार वाहन अधिनियम कलम ६६ नुसार खासगी वाहनाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करता येत नाही. तसे केल्यास कलम १९२ नुसार दंडात्मक व दंडविधानात्मक कारवाई होऊ शकते. या बेकायदेशीर वाहन सेवेचा उपयोग करून शासनाची व प्रवाशांची फसवणूक होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत या बेकायदेशीर सेवा थांबविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

बेकायदेशीर सेवा थांबविण्यासाठी परिवहन विभागाचे पाऊल

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा पुरवणारी दोन वाहने कार्यवाहीदरम्यान आढळून आली. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाणे येथे उबेर व रॅपिडो अॅपविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे व ओला या ॲपवर तक्रार नोंदवली आहे. तसेच बेकायदेशीर सेवा देणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे आदेश सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, फक्त परवानाधारक वाहतूक सेवांचा उपयोग करावा व स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर वाहन सेवांबाबत माहिती दिल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सहपरिवहन आयुक्त (अंमल २) द्वारे परिपत्रक काढण्यात आले आहे.