मुंबई : मुंबई आणि बंगळुरूदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी करणारी वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस गुरुवारी मुंबईत दाखल झाली. येत्या १ नोव्हेंबरला या गाडीचे उद्घाटन होणार असून, ३ नोव्हेंबरपासून नियमित प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या गाडीमुळे मुंबई-बंगळुरू प्रवासासाठी लागणारा वेळ सुमारे २४ तासांवरून १६ तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील पहिली वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळुरू) दरम्यान धावणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या या गाडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १६ वातानुकूलित डब्यांमध्ये एकूण ८२३ बर्थची व्यवस्था आहे.

१६ डब्यांत तीन श्रेणींची सुविधा

या गाडीमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलितचे ११, द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे चार आणि प्रथम श्रेणी वातानुकूलितचा एक डबा आहे. प्रवाशांसाठी आरामदायी बर्थ, मोबाइल आणि विद्युत उपकरणांच्या चार्जिंगची सुविधा, वाचनासाठी स्वतंत्र दिवे आणि सामान ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध आहे. स्वयंचलित दरवाजे, प्रवाशांना माहिती देणारी आधुनिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधाही देण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा, यासाठी टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातील स्वतंत्र कुपेमध्ये सेवेसाठी कर्मचाऱ्यांना बोलावण्याकरिता बटणाची सुविधा आहे. दिव्यांग प्रवाशांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा आणि धूर ओळखणारी उपकरणे याद्वारे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे.

आठ मध्यवर्ती स्थानकांवर थांबा

मुंबई – बंगळुरूदरम्यान या गाडीला कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुरगी, यादगीर, रायचूर, गुंटकल आणि अनंतपूर या आठ मध्यवर्ती स्थानकांवर थांबा प्रस्तावित आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रवाशांना वेगवान रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या मुंबई-बंगळुरूदरम्यान धावणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला प्रवासासाठी साधारण २२ ते २४ तास लागतात. नव्या वंदे भारत शयनयानमुळे प्रवासाच्या वेळेत सहा ते आठ तासांची बचत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, गाडीच्या नियमित सेवेचे अंतिम वेळापत्रक, थांबे आणि इतर तपशील रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होतील.