मुंबई : मुंबई – बंगळुरूदरम्यान धावणाऱ्या देशातील दुसऱ्या शयनयान वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन १ नोव्हेंबरला होणार आहे. बंगळुरू येथील एसएमव्ही स्थानकावर मान्यवरांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असून, २ नोव्हेंबरपासून तिची नियमित सेवा सुरू होईल. मुंबई, पुणे, सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना कर्नाटक आणि आंध्र प्रदेशशी जोडणारी ही पहिली शयनयान वंदे भारत ठरणार आहे.

उद्घाटन विशेष गाडी (०६५०३) १ नोव्हेंबरला दुपारी १२.१५ वाजता एसएमव्ही बंगळुरू स्थानकातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचेल. उद्घाटन विशेष गाडीला हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर, गुंतकल, रायचूर, कृष्णा, यादगीर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण येथे थांबे असतील.

नियमित सेवेत सीएसएमटी–एसएमव्ही बंगळुरू (२७६५१/२७६५२) या क्रमांकाने ही गाडी धावेल. गाडी क्रमांक २७६५१ सीएसएमटीहून २ नोव्हेंबरपासून दर मंगळवारी वगळता आठवड्यातून सहा दिवस रात्री ८.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता बंगळुरूला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २७६५२ बंगळुरूहून ३ नोव्हेंबरपासून दर सोमवारी वगळता आठवड्यातून सहा दिवस रात्री ७.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

नियमित सेवेला कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, गुंतकल आणि अनंतपूर येथे थांबे असतील. या गाडीला एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी आणि ११ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे असतील. शयनयान वंदे भारतमध्ये रात्रीच्या प्रवासासाठी आरामदायी शयनयान, मोबाइल चार्जिंग पॉइंट, सामानासाठी स्वतंत्र जागा, स्वयंचलित दरवाजे, दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा; तसेच आपत्कालीन बटणे आणि टॉकबॅक प्रणाली उपलब्ध असेल. या गाडीचे आरक्षण १ नोव्हेंबरपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. रेलवन ॲपवरूनही तिकीट आरक्षित करता येणार आहे, मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.