मुंबई : बेस्ट बस दुभाजकाला धडकून सात प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पवई परिसरात घडली. जखमींवर साकीनाका येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला आदळल्याचे स्पष्ट झाले. बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या वाढत्या अपघातांमुळे बेस्ट प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ईव्ही ट्रान्स कंत्राटदाराची विक्रोळी आगारातील ए-४२२ बस सकाळी ११.०५ वाजता पवई विहार संकुल येथे आली असताना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. बस विक्रोळी आगारातून वांद्रे बस स्थानकाकडे (पश्चिम) जात असताना डाव्या बाजूने येणाऱ्या चारचाकीकडे लक्ष गेल्याने चालकाचा गोंधळ उडाला आणि बस उजव्या बाजूकडील दुभाजकाला धडकली. यात बसमधील सात प्रवासी जखमी झाले.
आगार व्यवस्थापक किशोर शिंदे यांच्या आदेशानुसार, जखमी प्रवाशांना बस वाहकाने वैद्यकीय उपचारासाठी साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.बेस्टच्या ताफ्यात २,५०० बस भाडेतत्वावरील आहेत. या बस सहा कंत्राटदाराद्वारे पुरविण्यात येतात. बेस्टच्या कंत्राटी बसच्या अपघातांचे प्रमाण काही महिन्यांपासून वाढले आहे. चालकांचा प्रशिक्षण कालावधी वाढविल्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. दादर, अंधेरी, मानखुर्द येथील अपघात कंत्राटी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर वाढते अपघात कंत्राटी चालकांच्या चुकीमुळे होत असल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबईकरांमध्ये भीतीसुरक्षित व किफायतशीर प्रवासासाठी मुंबईकर बेस्टच्या प्रवासाला प्राधान्य देतात. सुमारे २३ लाख प्रवासी दररोज बेस्टने प्रवास करतात. परंतु बेस्टच्या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांना आता बेस्टच्या प्रवासाबाबत भीती वातावरण आहे. अनेकदा बेस्टमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.
