मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील टाटा कंपनीच्या भाडेतत्वावरील बसचा वरळी येथे गुरुवारी सकाळी अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोटारगाडीने अचानक यु-टर्न घेतल्याने बस चालकाने तात्काळ ब्रेक लावला. त्यामुळे बेस्ट बस रस्त्यावरील दुभाजकावर चढली. या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

वरळी आगारातील टाटा कंपनीची भाडेतत्वावरील बस मार्ग क्रमांक १६७ वर अप दिशेला पी. के. कुरणे चौक बस स्थानकाकडून प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवास करत होती. बस बॉम्बे डाईंग बस थांब्याजवळ आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोटारगाडीने अचानक यु-टर्न’ घेतला.

मोटारगाडीला बसची

धडक लागू नये यासाठी चालकाने तातडीने ब्रेक लावले. यामुळे, बस रस्त्यावरील दुभाजकावर चढली आणि तिथेच अडकून पडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर टाटाचे यांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बस बाहेर काढली.