मुंबई : बेस्टने गेल्या दोन वर्षांत भाडेतत्वावरील बस पुरविणाऱ्या कंत्राटदारांकडून नियमभंगाच्या कारणांमुळे एकूण १६ कोटी ५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अपघातांच्या वाढत्या घटना आणि चालकांच्या अनियमिततेमुळे बेस्ट उपक्रमाने कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली आहे.

दोन वर्षांत बस वेळेत न येण्याच्या १८ हजार ४३८ प्रकरणांची नोंद आहे. आर्थिक तोट्यातील बेस्ट उपक्रमाने काटकसर म्हणून स्वमालकीच्या बस खरेदी करण्याऐवजी भाडेतत्वावरील बस वापरण्यावर भर दिला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यातील २ हजार ८०० बसपैकी अडीच हजार बस या भाडेतत्वावर आहेत. बेस्टला आठ कंत्राटदारांकडून या बस पुरविण्यात येतात. कंत्राटदार उपक्रमाला वेळापत्रकानुसार बस पुरविण्यात अपयशी ठरतात. अनेकदा देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव बस रस्त्यावर धावत नाहीत, अशा वेळी बेस्टतर्फे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जानेवारी महिन्यापासून आगारात वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने उपक्रमाने कंत्राटदारांवर ९कोटी २२ लाखांचा दंड आकारला आहे.

आतापर्यंतची दंडात्मक कारवाई

– जुलै २०२५ ते जून २०२६ दरम्यान, बेस्टने कंत्राटी चालकांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. एका वर्षातील भाडेतत्वावरील बसच्या ८८ हजार २७४ तक्रारींपैकी, वाहन चालवण्यातील अनियमितता आणि शिस्तीच्या समस्यांसाठी दंडापोटी ६ कोटी ५४ लाख रुपये वसूल केले आहेत.

– चालकांना दंड आकारण्याव्यतिरिक्त, उपक्रमाने अपघातांसाठी कंत्राटदारांवर आर्थिक कारवाई केली आहे. मागील दोन आर्थिक वर्षांत बेस्टने कंत्राटदारांकडून अपघातांशी संबंधित दंडापोटी ७६ लाख ०५ हजार रुपये वसूल केले आहेत. २०२४-२५ या वर्षातच, अपघातांशी संबंधित दंडाची रक्कम २८ लाख ३८ हजार रुपये आकारली आहे.

– मारुती ट्रॅव्हल्सने १४ लाख ५० हजार ५५० , तर टाटा मोटर्सने ११ लाख ६४ हजार २८५ रुपये दंडापोटी भरले आहेत. स्विच मोबिलिटी, ईव्ही ट्रान्स, ओलेक्ट्रा आणि मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट यांसारख्या इतर कंत्राटदारांनी उर्वरित दंड भरला आहे.

– भाडेतत्वावरील बसचे अपघात यावर्षी कंत्राटी बसचे २० अपघात झाले असून, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, चालक प्रशिक्षण, चालकाचा थकवा, बसच्या देखभालीचे मानके आणि भाडेतत्वावरील बसच्या देखरेखीचा अभाव हे मुद्दे समोर आले आहेत.

बस फेऱ्या कमी; प्रवाशांची गैरसोय! देखभाल-दुरुस्तीचे वेळापत्रक तरीही विलंब

बसच्या देखभाल-दुरुस्तीचे वेळापत्रक असूनही, कंत्राटदार दिवसभरासाठी त्यांच्या बस तैनात करू शकले नाहीत. बस फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना गैरसोय झाली. बस फेऱ्यांची संख्या घटल्याने प्रवासी संख्या कमी होते. परिणामी महसुलावर देखील घटतो. बेस्ट ४०२ मार्गांवर सुमारे २,८०० बस चालवते. बेस्टने दररोज अंदाजे २२ लाख प्रवासी प्रवास करतात.