मुंबई : बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या भाडेतत्वावरील बसला होत असलेला विलंब आणि ताफ्यातील घटणारी बस संख्या यामुळे थांब्यावरील प्रतीक्षा वेळेत वाढ होत आहे. सध्या मुंबईकरांना बससाठी किमान ४५ ते ५० मिनिटे वाट पहावी लागत असल्याने प्रवासी हवालदिल होत आहेत. उपक्रमाने तीन वर्षांपूर्वी ओलेक्ट्रा कंपनीकडून साडेचार हजार वातानुकूलित सिंगल डेकर विद्युत बस घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी केवळ ७३५ बसच अद्यापपर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. प्रवासी संख्या वाढेल आणि उत्पन्न मिळेल, या आशेने उपक्रमाने गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील गाड्या दाखल केल्या. मात्र, या बसची संख्या फारशी वाढली नाही. तर दुसरीकडे बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्याही कमी झाली. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
बेस्टचा एकूण बस ताफा २०२२-२३मध्ये ३,५६९ होता. यामध्ये बेस्टच्या स्वमालकीच्या १,८८१ आणि भाडेतत्वावरील १,६८८ बस होत्या. सध्या बेस्ट उपक्रमाकडे एकूण २,७४१ बस आहेत. यापैकी २४९ स्वमालकीच्या व उर्वरित भाडेतत्त्वावरील आहेत. भाडेतत्त्वावरील बससाठी पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून, विविध मार्गांवर या बस चालवल्या जात आहेत. गेले काही महिने बेस्टचा ताफा तीन हजारच्या खाली आल्याने प्रवाशांचा बस थांब्यावरील प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे बसमार्ग रद्द करणे आणि बस अन्य मार्गाने वळवल्यानेही प्रवासी वाहतुकीसाठी पर्यायी सेवांचा अवलंब करावा लागत आहे.
प्रवासी वाढवेत यासाठी बेस्ट उपक्रमाने २३ मे २०२३ रोजी २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर वातानुकूलित बस पुरवण्याचे कंत्राट निविदा प्रक्रिया राबवून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. त्यापैकी ६८६ बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या. आतापर्यंत या १०० टक्के बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. दरम्यान, दीड वर्षापूर्वी याच कंपनीकडून आणखी २,४०० वातानुकूलित सिंगल डेकर बस घेण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला. मात्र आतापर्यंत ५० बसच ताफ्यात दाखल झाल्या आहेत. २,४०० बसचा ५० टक्के ताफा आतापर्यंत येणे अपेक्षित होते.
बसला विलंब का ?
२,१०० बससाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह अन्य साहित्याची समस्या निर्माण झाल्याने या बसचा वेळत पुरवठा होऊ शकलेला नाही. तसेच २,४०० वातानुकूलित बसच्या बॅटरी चार्जिंगची क्षमता वाढवण्यात येत आहे, जेणेकरून या बस जास्त किलोमीटर धावू शकतील. त्यामुळे विलंब होत असल्याचे समजते.
