मुंबई : बेस्ट उपक्रमाने ५ हजार स्वमालकीच्या बस खरेदी करण्यासाठी २३ आगारांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प राबविण्याआधी उपक्रमाच्या विविध आगार व बस स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांमधून विकासकांकडे सुमारे ३२०.०९ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याचा दावा ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’ संघटनेने केला आहे. जुन्या पुनर्विकास प्रकल्पातील थकबाकी प्राधान्याने वसुल करण्यात यावी. त्यानंतरच नव्याने २३ आगारांच्या पुनर्विकासाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्याकडे केली आहे.
बेस्ट उपक्रमाचे मुंबईत २७ आगार आहेत. यापैकी काही आगार आणि बसस्थानकांमधील जागांचा यापूर्वीच पुनर्विकास करण्यात आला आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांना आर्थिक फायदाही झाला, मात्र करारानुसार देय असलेले विकास हक्क शुल्क अद्याप बेस्टकडे पूर्णपणे जमा झालेले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होत असून बेस्टला आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर करारातील सर्व अटींची कठोर अंमलबजावणी करावी. आवश्यकता असल्यास न्यायालय किंवा इतर कायदेशीर उपायांचा अवलंब करून मूळ रक्कम, व्याज आणि दंडाची प्रभावी वसुली करावी, असेही संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
बेस्टकडून आधी पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित मूल्यांकन, लेखापरीक्षणातील त्रुटींची पूर्तता आणि थकीत महसुलाची वसुली करणे आवश्यक आहे. त्यानंतरच २३ आगारांतील पुनर्विकास प्रकल्पाचा विचार करावा. – रूपेश शेलटकर, अध्यक्ष, ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’
थकबाकीतून नवीन ६०० बस
- विकासकांकडून वसूल होणाऱ्या ३२०.०९ कोटी रुपयांतून बेस्टला स्वमालकीच्या नव्या ६०० बस खरेदी करता येतील. त्यामुळे भाडेतत्वावरील बसवरील अवलंबित्व कमी होऊन मुंबईकरांना नविन बस मिळतील.
- थकबाकी वसुलीची जबाबदारी बेस्टची मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बेस्ट महत्त्वाची असून बेस्ट बसमधून दररोज २३ लाख प्रवासी प्रवास करतात.
- बेस्टची शहरातील आगारे, बसस्थानके उपक्रमाची महत्त्वाची संपत्ती असून त्यांचे संरक्षण आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलाची वसुली करण्याची जबाबदारी बेस्टची आहे.
- विकासकांकडून येणाऱ्या ३२०.०९ कोटी रुपयांपैकी २९० कोटी रुपये मूळ देय रक्कम आहे. तर उर्वरित व्याज, विलंब, दंड आणि इतर अधिभारांची रक्कम आहे.
थकबाकीचा तपशील
| विकासक | आगार | थकबाकी |
| कणकिया समूह | कुर्ला, माहीम, यारी रोड आगार | १६८ कोटी |
| वाधवा समूह | ओशिवरा आगार | १४५ कोटी |
| के. एस. एल अँड इंडस्ट्रीज | मरोळ – मरोशी आगार | ३८ कोटी |
